अग्रलेख : वाढती अस्वस्थता…!

जगात आज अनेक ठिकाणांहून संघर्ष आणि युद्धाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत. ही वाढती जागतिक अस्वस्थता कोणत्या आपत्तीला निमंत्रण देणारी ठरणार आहे याचा अंदाज अजून कोणालाच येईनासा झाला आहे. एकीकडे इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षाला अचानक मोठे स्वरूप प्राप्त झाले असतानाच तिकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाची स्थितीही शिगेला पोहोचली आहे.
काल रविवारी लेबनॉनमधील हेजबुल्ला संघटनेने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली, तर सोमवारी युक्रेनच्या आक्रमकपणाला प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनवर तीनशे ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यांना दुसर्या बाजूकडून प्रत्युत्तर देण्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. मध्यपूर्वेत इस्रायलच्या विरोधात पॅलेस्टाइनमधील हमास, लेबनॉनमधील हेजबुल्ला आणि येमेनमधील हौथी यांनी संघटितपणे आघाडी उघडली असून त्यांना आता इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचीही मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हमासच्या नेत्याची इस्रालयने इराणमध्ये हत्या केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी इराण टपलेलेच आहे. ते इस्रायलवर हल्ल्याची संधीच शोधत आहेत. गेल्या जुलै महिन्यात अमेरिकेच्या पुढाकाराने तेथे शांततेची चर्चा झाली, पण या चर्चेच्या वेळी जे ठरले आहे त्याला कोलदांडा घातल्याचा आरोप इस्रायल आणि हेजबुल्ला यांनी एकमेकांवर केल्याने तडजोडीचे अमेरिकेचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
तिकडे सन 2022 पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षाने गेल्या दोन दिवसांत अत्यंत उग्र स्वरूप धारण केले आहे. युक्रेनने थेट रशियातील मोठ्या भूप्रदेशात आक्रमण करून रशियाला नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर रशियाने आपल्या भात्यातील क्षेपणास्त्रे बाहेर काढून युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेन जर आटोक्यात आला नाही, तर रशिया त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांचा शेवटचा पर्याय वापरू शकते काय, या चिंतेने जगाला सध्या ग्रासले आहे. तसे झाले तर त्याची व्याप्ती जागतिक स्तरावर वाढू शकते. एकमेकांशी संघर्ष करीत असलेल्या या देशांमध्ये शांतता किंवा तडजोड करण्यासाठी जागतिक पातळीवरून जे प्रयत्न अपेक्षित आहेत ते होताना दिसत नाहीत. किंंबहुना अशा प्रसंगी संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने जे प्रयत्न करणे अपेक्षित असते तेही त्यांच्याकडून होताना दिसत नाहीत. जगातला कोणताही प्रश्न चर्चेने सुटू शकतो अशी जी धारणा असते त्यालाच या दोन्ही ठिकाणच्या संघर्षात तिलांजली दिली गेली आहे. नमते कोणी घ्यायचे यावर हे तडजोडीचे प्रयत्न अडले आहेत. इस्रायल आणि त्यांचे शत्रू, रशिया आणि युक्रेन हे सगळेच जण एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागला पाहिजे अशा निकरावर आले आहेत आणि बाकीचे जग निवांत बसून हा सारा संहार पहात बसले आहे, असे जे चित्र निर्माण झाले आहे ते वेदनादायी आहे.
नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी थोडे प्रयत्न करून पाहिले. पण त्यात त्यांना दुर्दैवाने यश आलेले नाही. किंबहुना त्यांच्या दोन्ही देशांच्या नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर त्या दोन्ही देशांमधील एकमेकांवरील हल्ले आणखीनच तीव्र झालेले पाहायला मिळाले आहेत. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना मिठी काय मारली, तिकडे युक्रेनच्या नेत्यांचे माथे भडकले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोदींच्या या कृत्यावर थेट शब्दांत आक्षेप घेतलेला दिसला. मोदींची ही कृती म्हणजे शांतता प्रक्रियेवरचाच विनाशकारी हल्ला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याचाच अर्थ असा की, मोदींच्या प्रयत्नांना दोन्ही देशांनी जराही दाद न दिल्याने बाकीच्या देशांची आपण या भानगडीत न पडलेलेच बरे अशी धारणा झाली असल्यास नवल नाही. दोन्ही ठिकाणचा संघर्ष त्यांच्या पुरताच मर्यादित न राहता त्याची व्याप्ती जागतिक स्तरावर वाढण्याचा जो धोका निर्माण झाला आहे तो अधिक चिंताजनक आहे.
युक्रेनच्या बाजूने युरोपीय देश एकवटले आहेत. ते रशियाला दमात घेऊ पहात आहेत, तर दुसरीकडे मध्यपुर्वेतील संघर्षात इराण उतरला, तर त्यांनाही जरबेत घेण्यासाठी अमेरिका आणि त्यांची दोस्त राष्ट्रे या संघर्षात उतरण्याचा धोका नाकारता येत नाहीत. त्यामुळे ही संघर्षाची स्थिती येणार्या काळात कशी वळण घेणार याकडे सगळ्या जगातील लोक लक्ष ठेवून आहेत. ही जागतिक अस्वस्थता सगळ्याच क्षेत्रातील विपरीत परिणामांना निमंत्रण देणारी ठरणार आहे. हा धोका जागतिक अर्थकारणासाठीही काळजी वाढवणारा आहे. जगात संघर्ष पेटता ठेवणे हे अमेरिकेसारख्या काही मोठ्या राष्ट्रांचा आवडता खेळ असतो, असे चित्र जगभरातील विचारवंतांनी आपल्यापुढे उभे केलेलेच आहे. अमेरिकेला त्यांची शस्त्रास्त्रे विकायची असतात त्यामुळे ते असा संघर्ष सतत पेटता कसा राहील या प्रयत्नांत असतात हा त्या विचारवंताचा आवडता युक्तिवाद असतोे. तो काही प्रमाणात पटणाराही असतो.
वास्तविक संयुक्त राष्ट्रांचे व्यासपीठ वापरून हा संघर्ष आटोक्यात आणणे अमेरिकेला अशक्य नाही. या संघटनेवर अमेरिकेचा मोठा प्रभाव आहे. पण तो ते वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे जागतिक विचारवंतांच्या मुद्द्यांची सत्यता पटू लागते. तिकडे जगाच्या व्यासपीठावर अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या स्पर्धेचेही सावट आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय विषयाकडे अमेरिका-चीन संघर्षाच्या चौकटीतूनच पाहिले जाते. रशिया-युक्रेन संघर्षात हाच अँगल आहे. चीन रशियाच्या पाठीशी आहे हे केव्हाच स्पष्ट झाले आहे. रशियावर जगाने आर्थिक निर्बंध लागू केल्यानंतर त्यांच्या तेलाचे सर्वात मोठे गिर्हाईक चीन ठरले आहे आणि त्या मदतीमुळे रशिया तगून आहे. चीनपाठोपाठ भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करीत आहे. त्यामुळे अमेरिकादि राष्ट्रे भारतावर खार खाऊन आहेतच. हे सगळे आपसांतील गुंतागुंतीचे हितसंबंध या वाढत्या अस्वस्थतेला कारणीभूत ठरतात. जगात आज अनेक ठिकाणी जागतिक तापमान वाढीतून निर्माण झालेले नैसर्गिक संकटांचे आव्हान मोठे असताना त्यात ही सगळीकडे उद्भवणारी युद्धजन्यस्थिती आटोक्यात राहावी, असे कोणालाच कसे वाटत नाही हा काळजी वाढवणारा प्रश्न आहे.





