Nagar | जिल्ह्यातील धान्य वितरण ठप्प: ऑफलाईन धान्यवितरण करण्यास परवाणगी

नगर, (प्रतिनिधी) – समाजातील गरीब आणि दुर्बल घटकातील कुटुंबांना दर्जेदार धान्य मिळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो. ई-पॉश मशिनचे सर्व्हर धिम्यगती चालत असल्याने धान्य वितरण ठप्प झाले आहे. जिल्ह्यातील ७ लाख २४ हजार ५२० कुटुंबांतील २९ लाख ३६ हजार ७०७ व्यक्तींना धान्य मिळणे बंद झाले आहे.
तो पर्यंत पुरवठा विभागाला आयएमपीडीएस पोर्टलद्वारे आॅफलाईन पध्दतीने धान्य वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गरीब आणि दुर्बल गटातल्या लोकांसाठी अन्नधान्याची सुलभ, किफायतशीर दरामध्ये उपलब्धतेसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ च्या तरतुदी करण्यात आली. गरीब आणि दुर्बल कुटुंबातील व्यक्ती या रोजगारासाठी बऱ्याचदा बाहेरगावी असत. त्यामुळे त्यांच्या नावावरील धान्याचा गैरप्रकार होत होता.
केंद्र शासनाने २०१९ मध्ये ई-पॉश मशिनद्वारे धान्य देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील व्यक्तींच्या ठसा या मशिनवर घेतल्यानंतर धान्य देता येते. एकात्मिक योजनेअंतर्गत दोन अन्न अनुदान योजना समाविष्ट केल्या जात आहेत.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंबे आणि प्राधान्य कुटुंबांतील व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून करोना साथीच्या काळात मोफत धान्याचा पुरवठा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार २०२३ या वर्षापासून पुढील पाच वर्ष राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्या लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये गहू १५ किलो, तर तांदूळ २० किलो दिला जातो. जिल्ह्यात ८७ हजार ७०३ अंत्योदयचे शिधा पत्रिकाधारक आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला पाच किलो धान्य दिले जाते.
गहू २ किलो तर तांदूळ ३ किलो दिले जात आहेत. जिल्ह्यात ६ लाख ३६ हजार ८१७ शिधापत्रिका धारक आहेत. २५ लाख ४७ हजार ५३५ लाभार्थी आहेत. जिल्ह्यात ७ लाख २४ हजार ५२० कुटुंबांतील २९ लाख ३६ हजार ७०७ सदस्यांना या योजनेतून धान्य मिळत आहे. एक हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानांमार्फत हे धान्याचे वाटप केले जात आहे.
ई-पॉश मशिनचे सर्व्हरमध्ये १५ जुलैपासून तांत्रिक बिघाड झाला. हे सर्व्हे अत्यंत धिम्य गतीने चालत आहे. एका दिवसभरात एका दुकानातून सरासरी पाच ते सहा शिधापत्रिका धारकांना धान्य देण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप थांबविले.
राज्य पातळीवरच ही समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे आॅफलाईन धान्य वितरण करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. रेशन दुकानदारांना आयएमपीडीएस पोर्टलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार वाटप करण्यात येइल.
हेमा बडे,
तालुका, कुटुंब, सदस्यसंख्या
अकोले-४१, ६६९ -२, ०५,९९२, जामखेड -३३,१०० – १,३१,३७६, कर्जत-४५,७७१ – १, ५९,८०७, कोपरगाव – ४६,६०८ -१,९५,७९०, नगर-४८, ८७८ – १, ८७,८३८, नगर शहर- ३४,२८८ – १,२९,३४१, नेवासे- ५६,०६९ -२,१९,५७, पारनेर-५४,३६२ -२,०४,०६२, पाथर्डी-४१, ५०९- १,७६,१५४, राहाता-५१, ७१९ -२,१५,३४९, राहुरी-५३,८५७ -२,२६, ६०८, संगमनेर-७०, ५५२- ३, ३५,५३८, शेवगाव-४२, ७३९ -१,७९, ४३५, श्रीगोंदे-५२, ६१०-२,०५,८७१, श्रीरामपूर-३७,७५४ – १,६४,७५४.





