रशिया-युक्रेनकडून एकमेकांवर हवाई हल्ले सुरूच

किव्ह : रशिया आणि युक्रेनने शनिवारी रात्रभर एकमेकांवर हवाई हल्ले सुरू ठेवले. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या हद्दींमध्ये तब्बल १०० लष्करी ड्रोन डागले गेले. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेऊन ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाबाबत चर्चा केली. त्यानंतर २४ तासांच्या आतच हे ड्रोन हल्ले करण्यात आले.
ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे रशियातल्या क्रासनोवआर्मेस्की जिल्ह्यातल्या ल्युकऑइल या तेलशुद्धिकरण प्रकल्पाजवळ आग लागली, असे वोल्गोग्राडचे प्रादेशिक गव्हर्नर आंद्रेई बोचारोव्ह यांनी सांगितले. या तेलशुद्धिकरण प्रकल्पाला युक्रेनकडून युक्रेनच्या सैन्याकडन यापुर्वीदेखील लक्ष्य करण्याचे प्रयत्न होऊन गेले आहेत. यापूर्वी सर्वात अलिकडच्या काळात १५ फेब्रुवारीला युक्रेनने या प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला होता. जवळपासच्या विमानतळांवरील विमान वाहतूक थोड्या काळासाठी थांबवण्यात आली. मात्र कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
युक्रेनने डागलेली १२६ ड्रोन पाडली गेल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. त्यातील ६४ ड्रोन वोलगोग्राड भागात पाडली गेली. याशिवाय वोरोनेझ, बेल्गोरोड, ब्रायन्स्क, रोस्तोव आणि कुर्स्क प्रदेशात डागलेली ड्रोन पाडली गेली. दुसरीकडे रशियाने देखील १७८ ड्रोन आणि २ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती, असे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे.
रशियाने शाहीद प्रकारच्या ड्रोनसारखी ड्रोन डागली गेली होती. त्यातील १३० ड्रोन पाडली गेली. तर ३८ ड्रोन हवेतच भरकटल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या निप्रोपेट्रोवस्क आणि ओडेसा भागातल्या वीज सुविधांचे मोठे नुकसान झाले, असे डीटीइके या सरकारी कंपनीने म्हटले आहे.





