टोकियो – जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्या पार्थिवावर काल कौटुंबिक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी देशातील बहुतेक प्रमुख राजकीय नेते, वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. राजधानी टोकियोच्या बाहेरील झोजिया मंदिराच्या प्रांगणात मोठा जनसमुदाय जमा झाला होता.
जमा झालेल्या शेकडोंच्या जनसमुदायाने हातात ऍबे यांचे फोटो घेतले होते. अंत्ययात्रेच्यावेळी ऍबे यांचे पार्थिव ज्या वाहनातून नेले गेले, त्या वाहनाबरोबर वाहनांचा मोठा ताफा होता. त्यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ऍबे यांचे पार्थिव असलेल्या वाहनातच ऍबे यांच्या पत्नी ऍकी ऍबे यादेखील होत्या. जनसमुदायाच्या भावनांचा आदर त्या केवळ डोके हलवूनच करत होत्या.
ही अंत्ययात्रा टोकियोतील नागाता-चो या प्रमुख राजकीय मुख्यालयापासून सुरू झाली. ऍबे 1991 मध्ये पहिल्यांदा निवडून आले तेंव्हापासून ते बहुतेक कालावधी त्यांनी याच इमारतीत घालवला होता. पार्थिव असलेली गाडी मंदिराच्या दफनभूमीच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी छातीवर हात ठेवून ऍबे यांना आदरांजली वाहिली. केवळ ऍकी ऍबे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि प7ाचे निवडक वरिष्ठ पदाधिकारी मंदिरातील प्रत्यक्ष अंत्यसंस्काराच्या विधींच्यावेळी उपस्थित होते.
ऍबे यांच्या हत्येनंतर दोनच दिवसांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणूकीत सत्तारुढ लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि सहयोगी पक्षांच्या आघाडीला मोठे यश मिळाले होते. पण या विजयाचा आनंद देशभरात कोठेही साजरा झाला नाही.
ऍबे यांच्या हत्येबद्दल ताब्यात घेण्यात आलेल्या तेत्सुया यामीगामी याला तीन आठवड्यांची कोठडी सुनावण्यात आली आहे. संपूर्ण देशाला धक्कादायक असलेल्या या हत्येनंतर देशातील सर्व राजकीय नेते आणि उद्योजकांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.