Pimpri : इ-पॉस मशीनच्या अडचणीमुळे धान्य वितरण जवळपास ठप्प

कामशेत : संपूर्ण राज्यात इ-पाॅस मशीनच्या तक्रारी वाढल्या असल्याने धान्य वितरण व्यवस्था जवळपास ठप्प झाली आहे. डिसेंबर महिन्याची सतरा तारीख उलटली तरीही रेशनधारकांना अद्याप धान्य मिळालेले नाही. धान्य घेण्यासाठी लाभार्थी रेशन दुकानात येतात, परंतु मशीन काम करत नसल्याने धान्य वाटप होत नाही.
याचा रोष रेशन वितरकांना सहन करावा लागत आहे. कामशेत शहरात मागील पंधरा दिवसांपासून हीच परिस्थिती असून रेशन दुकानदार इ-पॉसच्या सततच्या तांत्रिक अडचणीला वैतावले आहेत. तर लाभार्थी दुकानात चकरा मारुन मेटाकुटीला आले आहेत.
धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी यासाठी रेशन दुकानात इ-पाॅस मशीन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना मशीनवर ‘अंगठा’ दाखवून ओळख पटविल्यानंतरच धान्य दिले जाते. मावळात ग्रामीण भागात आधी या यंत्राला कनेक्टिव्हिटीची समस्या सतावत होती. त्यानंतर आता सर्व्हरच्या अडचणीमुळे इ-पाॅस मशीन काम करीत नाही. मशीन मधल्या बिघाडामुळे खेडोपाडी लाभार्थ्यांना तासनतास रेशन दुकानात बसून राहावे लागत आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच धान्य वितरण केवळ मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाले आहे. धान्य दुकानात असूनही दुकानदारांना त्याचे वितरण करता येईना, दुसरीकडे धान्य घेण्याकरीता लाभार्थी आपला कामधंदा सोडून दुकानात हेलपाटे घालत आहेत. बिघाड झालेले इ-पॉस मशीन केव्हा दुरुस्त होईल हे दुकानदारांनाही सांगता येत नसल्यामुळे कार्डधारक व दुकानदार यांच्यात किरकोळ वाद होत आहेत.
लाभार्थी आणि वितरकांमध्ये होताहेत वाद
रेशनकार्ड धारकांना हाताचा अंगठा वठवून मिळणारे धान्य जवळपास दोन आठवड्यांपासून मिळणे बंद झाले आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. विविध कारणांमुळे इ-पॉस मशीन सतत बंद पडण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे धान्य वितरण ठप्प झाले असून रेशन दुकानदारांना मात्र लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
सर्व्हर डाऊन होणे ही नित्याची बाब बनली आहे. इ-पॉस मशीन काम करत नसल्यामुळे धान्य वाटप करणे शक्य होत नाही. शासनाने एक तर सर्व्हरची अडचण कायमची दूर करावी किंवा थेट ऑफलाइन धान्य वाटपाला परवानगी द्यावी. रेशनकार्ड धारकांना ३१ डिसेंबरपर्यंत इ-केवायसी करण्याची मुदत आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने इ-पॉस मशीन कार्यन्वित होत नसून यामुळे इ-केवायसीचे काम देखील ठप्प झाले आहे. शासनाने आता इ-केवायसी करण्याची मुदत आणखीन वाढवली पाहिजे.
– बाबूलाल नालबंद, अध्यक्ष, रेशन दुकानधार संघटना





