द हेग (नेदरलॅन्ड) – युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले असल्याचा ठपका युरोपातल्या सर्वोच्च मानवी हक्क विषयक न्यायालयाने ठेवला आहे. मलेशिया एअरलाइन्सचे विमान पाडण्यामागेही रशियाचा हात असल्याचा ठपका या न्यायालयाने ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पहिल्यांदाच रशियाला मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी जबाबदार धरले आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध छेडल्यापासून युक्रेन आणि नेदरलॅन्डने रशियाविरोधात दाखल केलेल्या चार मोठ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. रशियावर ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये खून, छळ, बलात्कार, नागरी पायाभूत सुविधा नष्ट करणे, युक्रेनियन मुलांचे अपहरण करणे आणि रशियाच्या भूमीवरून सक्रिय असलेल्या युक्रेनच्या फुटिरतावाद्यांकडून मलेशियाचे एमएच-१७ हे प्रवासी विमान पाडण्याच्या आरोपांचा समावेश होता. रशियाविरोधातल्या खटल्याच्या अंतिम सुनावणीच्यावेळी स्टारबर्गमधील कोर्टरुममध्ये खचाखच गर्दी होती. रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन केले आहे. असे हल्ले करून हजारो नागरिकांचा बळी घेतला आणि जखमी केले.लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण केली, असे न्यायालयाचे अध्यक्ष मॅटियास ग्योमर म्हणाले. लष्करी कारवाईच्या पुढे हे मानवी हक्कांचे अवमूल्यन होते. रशियाने लैंगिक हिंसाचाराचा युक्रेनचे नैतिक खच्चीकरण करण्यासाठी धोरण म्हणून वापर केला. बलात्काराचा युद्धाचे शस्त्र म्हणून वापर करणे हे अत्यंत क्रूर कृत्य होते. हे कृत्य म्हणजे छळासारखे होते, असे व्यायालयाने म्हटले. या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या प्रशासकीय मंडळाने या तक्रारी न्यायालयासमोर मांडल्या होत्या. या प्रशासकीय मंडळाला रशियातून २०२२ मध्ये हाकलून देण्यात आले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालाकडे रशियाने फारसे लक्ष दिलेले नाही. या निकालाचा रशियावर काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे या निकालाकडे केवळ एक प्रतिकात्मक ठपका म्हणून बघितले जाते आहे.