रूपगंध : राजस्थानात भाजप-काँग्रेसची कसोटी

राजस्थानातील कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासमवेत एकत्र येत विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, कॉंग्रेस पक्ष हा संपूर्णपणे ऐक्याने विधानसभेच्या मैदानात उतरत आहे. गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद निकाली निघत असल्याने राजस्थान कॉंग्रेसमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतो. कॉंग्रेस हायकमांडच्या या रणनीतीमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे. भाजप अजूनही कॉंग्रेसमधील मतभेद आणि ओढाताणीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आता रणनीतीत बदल झाल्याने कॉंग्रेसशी आरपार लढाई करावी लागणार आहे.
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील ऐक्य साधण्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कॉंग्रेसने राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, पायलटच्या दबावापोटीच हा निर्णय हायकमांडने घेतला असल्याचे बोलले जात आहे. राजधानी दिल्लीत राजस्थानातील राजकीय पेचावरून झालेल्या बैठकीनंतर पायलट देखील झाले गेले विसरून जाऊ, नव्या रणनीतीवर वाटचाल करू, असे धोरण ठेवत आहेत. त्यांनी एका वक्तव्यात गेहलोत यांचा आदर सन्मान करत मतभेद विसरून जाण्याची भूमिका मांडली आहे.
पायलट यांच्या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, कॉंग्रेस पक्ष हा संपूर्णपणे ऐक्याने विधानसभेच्या मैदानात उतरत आहेत. गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद निकाली निघत असल्याने राजस्थान कॉंग्रेसमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, कॉंग्रेस हायकमांडच्या या रणनीतीमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे. भाजप अजूनही कॉंग्रेसमधील मतभेद आणि ओढाताणीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आता रणनीतीत बदल झाल्याने कॉंग्रेसशी आरपार लढाई करावी लागणार आहे.
पायलट यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासमवेत एकत्र येत विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. पायलट यांनी म्हटले, की राजस्थानातील सामूहिक नेतृत्वाला बळकटी देत निवडणूक लढविणे हाच एक मार्ग आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील आपल्याला मागचे विसरून जाण्याचा सल्ला दिल्याचे पायलट म्हणाले. खर्गे यांनी अध्यक्ष या नात्यांने सर्वांना एकवाक्यता ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीनंतर पायलट यांच्या भूमिकेत बदल झाला आहे. त्यांनी म्हटले की, गेहलोत माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि त्यांना माझ्यापेक्षा अधिक राजकीय अनुभव आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री या नात्यांने त्यांच्या खांद्यावरही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. पायलट यांच्या मते, राजस्थानातील कोणताही व्यक्ती असे म्हणू शकत नाही की निवडणूक जिंकण्यासाठी आपण जादूची कांडी फिरवू. 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलो आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्य कॉंग्रेसकडे आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशी संबंधित प्रश्नावर पायलट म्हणाले, की निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची दीर्घकाळापासून कॉंग्रेसची परंपरा राहिली आहे. याच भूमिकेवर पक्ष अनेक वर्षांपासून वाटचाल करत आहे. आपल्याबाबतचा निर्णय पक्षाच्या नेत्यांना घ्यायचा आहे. राजस्थानची निवडणूक जिंकण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करु.
पायलट यांच्या विधानाने एक गोष्ट स्पष्ट झाली, की राजस्थानातील राजकीय संकट दूर करण्यात पक्षाचे नेतृत्व काही प्रमाणात यशस्वी ठरले. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. भाजप अजूनही गेहलोत आणि पायलट यांच्यात तयार झालेल्या वादाचा लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आतापर्यंत कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून पक्षातील मतभेदांचा प्रामुख्याने उल्लेख केला. वास्तविक आता राज्याची स्थिती बदलताना दिसून येत आहे. कॉंग्रेसमध्ये ऐक्य झाल्याने भाजपसमोर अडचणी वाढत आहेत. राजकीय तज्ञांच्या मते, राजस्थान कॉंग्रेसमध्ये असेच वातावरण राहिले तर भाजपसमोर आव्हाने वाढू शकतात. भाजपला बदलत्या रणनितीसह कॉंग्रेसवर हल्लाबोल करावा लागेल. त्याची झलक आता पाहवयास मिळत आहे. बिकानेर येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गेहलोत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, दिल्लीकडून पाठविण्यात येणारी मदत ही राजस्थानात येताच त्यावर कॉंग्रेसचा पंजा झडप घालतो. त्यामुळे आगामी काळात भाजपकडून गेहलोत सरकारवर प्रखर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कॉंग्रेसची नवीन कार्यकारिणी
यादरम्यान, राजस्थान कॉंग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत अशोक गेहलोत यांचा दबदबा वाढलेला दिसतो. कार्यकारिणीत सचिन पायलट यांच्या समर्थकांना कमी प्रमाणात स्थान दिले आहे. गेहलोत हे गेल्या चार दशकांपासून राजकारणात असून राज्यातील कॉंग्रेसचे बहुतांश नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूने आहेत. काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या कार्यकारिणीतून सचिन पायलट समर्थक नेत्यांना बाहेरचा मार्ग दाखविण्यात आला. अर्थात काही समर्थकांना सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि चिटणीस केले आहे. मात्र बहुतांश नेत्यांने नाव यादीतून वगळले आहे. दुसरीकडे राजस्थानातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आपली आघाडी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. यानुसार अलीकडच्या काळात जयपूर येथे अन्य पक्षातील नेते मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल झाले. या नेत्यांची प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेटही घडवून आणली. नड्डा यांनी देखील त्यांचे जोरात स्वागत केले. त्याचबरोबर या नेत्यांच्या आगमनामुळे पक्ष आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.
प्रदेश कॉंग्रेसने आपल्या टीममध्ये सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही नेत्यांच्या वक्तव्यांत विरोधाभास दिसत आहे. काही नेते म्हणतात की, पक्षात गटबाजी नाही, तर काही जण म्हणतात की, सर्व गटातील लोकांना आता एकत्र केले आहे. जयपूरमध्ये प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी सरचिटणीस सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले, की सर्वांशी चर्चा करून नियुक्त्या करण्यात आल्या. एवढेच नाही तर सर्व नेते समाधानी असून ज्या प्रमाणे ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीत नाराजी दिसली नाही, त्याचप्रमाणे या नियुक्तीही कोणी नाराजी व्यक्त केली नाही. 217 च्या कार्यकारिणीत पायलट यांच्याकडील 22 नेते पदाधिकारी झाले आहेत. पायलट यांच्या जवळचे नेते म्हणून या 22 नेत्यांकडे पाहिले जाते, मात्र काही जण या यादीबाहेरही गेले आहेत. यापैकी बहुतांश नेते “उदयपूर फॉर्म्युला’मुळे बाहेर गेले. एकुणातच अशोक गेहलोत आणि “पीसीसी’चे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासारा यांचा संपूर्ण यादीवर दबदबा राहिला आहे.
– विनायक सरदेसाई




