Sadhvi Prem Baisa Death : प्रसिद्ध धार्मिक प्रवचनकार साध्वी प्रेम बैसा (२५ वर्ष) यांचा बुधवारी संध्याकाळी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. आश्रमात तापावर उपचार सुरू असताना त्या अचानक कोसळल्या आणि उपचारापूर्वीच त्यांचा अंत झाला. राजस्थानातील जोधपूरमधील पाल गाव येथील त्यांच्या आश्रमात ही घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या अनुयायांनी आश्रमाबाहेर निदर्शने करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रेम बैसा गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी होत्या. त्यांच्यावर आश्रमातच उपचार सुरू होते. बुधवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांचे वडील आणि एका तरुणाने त्यांना खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मृत’ घोषित केले. एसीपी (पश्चिम) छवी शर्मा यांनी सांगितले की, “साध्वींना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, आश्रमात एका कंपाउंडरला इंजेक्शन देण्यासाठी बोलावण्यात आले होते, त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.” Sadhvi Prem Baisa Death इन्स्टाग्रामवरील ‘सुसाईड नोट’मुळे गूढ वाढले – साध्वींच्या निधनानंतर काही तासांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांनी या पोस्टचे वर्णन ‘संभाव्य सुसाईड नोट’ असे केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सनातन धर्माच्या प्रचारासाठी जगले आहे. मला ‘अग्निपरीक्षा’ द्यायची होती, पण ती नाकारली गेली. मी या जगाचा कायमचा निरोप घेत आहे, पण मला विश्वास आहे की माझ्या जाण्यानंतर मला न्याय मिळेल.” त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आदि जगद्गुरु शंकराचार्यांचाही उल्लेख केला आहे. ब्लॅकमेलिंग आणि बनावट व्हिडिओचे प्रकरण – साध्वी प्रेम बैसा यांनी सहा महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आश्रमातीलच काही कर्मचारी एका ‘डॉक्टर्ड’ (बनावट) व्हिडिओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या व्हिडिओच्या बदल्यात त्यांच्याकडे २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी जोगेंद्र उर्फ जोगाराम नावाच्या व्यक्तीला अटक केली होती, जो आश्रमात साऊंड सिस्टीमचे काम पाहत असे. आश्रमात तणावाचे वातावरण – साध्वींच्या निधनाची बातमी समजताच मोठ्या संख्येने भक्त आश्रमात जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तपासात पारदर्शकता आणण्याची मागणी केली. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.