Vishnu Modi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णु मोदी यांचे निधन
राजस्थानच्या राजकीय विश्वातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अजमेरचे माजी खासदार विष्णु कुमार मोदी (Vishnu Modi) यांचे शनिवारी जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

Vishnu Modi : राजस्थानच्या राजकीय विश्वातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अजमेरचे माजी खासदार विष्णु कुमार मोदी (Vishnu Modi) यांचे शनिवारी जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि दीर्घ आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्या निधनाच्या (Vishnu Modi) बातमीने राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
विष्णु मोदी यांचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला होता. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने, विकासकामांद्वारे आणि जनसंपर्काने जनतेच्या मनात विशेष स्थान मिळवले होते. १९८४ मध्ये त्यांनी अजमेर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवला आणि आठव्या लोकसभेचे सदस्य म्हणून दिल्लीत प्रवेश केला. या काळात त्यांनी अजमेरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विधानसभा स्तरावरही त्यांनी दोन वेळा आपली छाप उमटवली. १९९३ ते १९९८ पर्यंत ते पुष्कर मतदारसंघाचे आणि २००३ ते २००८ पर्यंत मसूदा मतदारसंघाचे आमदार होते. युवा राजकारणातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते; १९८१ ते १९८५ या काळात ते राजस्थान युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. या पदावर असताना त्यांनी राज्यातील हजारो तरुणांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि पक्षाला मजबूत केले.
विष्णु मोदी हे नीमकाथाना (सीकर) येथील रहिवासी होते. त्यांनी सरकारी महाविद्यालयातून बी.ए. पदवी प्राप्त केली. विद्यार्थीदशेपासूनच ते राजकारणात सक्रिय होते आणि नंतर राज्यस्तरीय नेते म्हणून ओळखले गेले. त्यांचे कुटुंब राजस्थानच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहिले आहे.
वडील किशन मोदी हे १९७१ ते १९७७ पर्यंत सीकरचे खासदार होते, तर काका मोहनलाल मोदी हे नीमकाथानातून पाच वेळा आमदार होते. अशा प्रकारे मोदी कुटुंबाने (Vishnu Modi) राजस्थानच्या विकास आणि राजकारणासाठी अनेक दशकांचे अमूल्य योगदान दिले आहे.






