HSRP Number Plate: राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) १ जुलै २०२६ पासून सक्तीची करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी केली. निर्धारित मुदतीत HSRP न बसविलेल्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. राज्य सरकारने यापूर्वी जुन्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर वाहनधारकांच्या सोयीसाठी ही मुदत वाढवून ३० जून २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. सार्नाईक म्हणाले, “वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी HSRP ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.” हेही वाचा – मंत्रिमंडळ बैठकीतील 7 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी आगाऊ स्लॉट बुक करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ३० जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभर विशेष तपासणी मोहीम – १ जुलै २०२६ पासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून HSRP नसलेली वाहने तपासली जाणार आहेत. मुदतीत नंबर प्लेट न बसविणाऱ्या किंवा स्लॉट बुक न करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी आणि एजंट किंवा अनधिकृत व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले. वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेऊन नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.