Road Safety : सणसरमध्ये मृत्यूचा सापळा? ब्रिटीशकालीन पुलाचे कठडे कोसळले; मोठी दुर्घटना घडण्याची भीती
Road Safety : नीरा डावा कालव्यावरील ब्रिटीशकालीन पुलाचे संरक्षक कठडे तुटले; जड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलाला धोका, स्थानिक ग्रामस्थांची नवीन पुलासाठी आर्त हाक.

Road Safety – सणसर (इरिगेशन बंगला) येथील नीरा डावा कालव्यावरील ब्रिटीशकालीन पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटून कालव्यात कोसळले आहेत. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणार्या वाहनांना मार्गाचा अंदाज न आल्याने थेट कालव्यात पडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिणामी, स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून तातडीने नवीन पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटीश काळात निरा डावा कालवा खोदण्यात आला होता. बारामती-इंदापूर मार्गालगत वाहणार्या या कालव्यावर त्या काळात दगडी पूल उभारण्यात आले. मात्र कालांतराने या पुलांची झीज होऊन ते जीर्णावस्थेत पोहोचले आहेत. विशेषतः सणसर बंगला परिसरातील पूल संरक्षक कठड्यांशिवाय अत्यंत धोकादायक ठरला आहे. दरम्यान, हा मार्ग सध्या पालखी मार्ग म्हणूनही वापरात असल्याने वाहतुकीचा मोठा ताण या पुलावर पडत आहे.
दररोज हजारो वाहने, तसेच साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी जड वाहने याच मार्गावरून ये-जा करतात. याशिवाय काही महिन्यांत होणार्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी याच मार्गाने प्रवास करतात. अशा परिस्थितीत पुलावरील कठडे कोसळल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुलाची अवस्था अधिकच बिकट झाली असून लोखंडी पाइपचे कठडे पूर्णतः कालव्यात पडले आहेत.
त्यामुळे पुलावरून जाणार्या वाहनांचा प्रवास अक्षरशः जीवघेणा बनला आहे. याबाबत संतप्त नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, संबंधित यंत्रणा गंभीर दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? विशेष म्हणजे, या मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले असून संबंधित जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. मात्र कोट्यवधींचा निधी खर्च करूनही या पुलाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी बांबूचे कठडे उभारण्यात आले होते; मात्र तेही कालव्यात वाहून गेले. एकूणच, दीडशतक जुना हा पूल आता कालबाह्य ठरत असून वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर तो सुरक्षिततेच्या दृष्टीने अपुरा पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही.
प्रशासनावर टीका
या संदर्भात सणसर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अक्षय काटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर टीका केली आहे. वाहने कालव्यात पडून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच स्थानिक पदाधिकार्यांनी या पुलाचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करून नवीन पूल उभारावा, तसेच कायमस्वरूपी मजबूत संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी केली आहे. कारण, कालव्याच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने कोणतीही दुर्घटना गंभीर ठरू शकते.






