RMC Mixer: आरएमसी प्लँट नियमावलीचे भिजत घोंगडे; ‘या’ दिवशी मिक्सर वाहनांना शहरात प्रवेशास परवानगी
RMC Mixer: आरएमसी प्लँट चालकांसाठीच्या नियमावलीचा निर्णय अजूनही प्रलंबित; लवकरच नियमावली तयार करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आश्वासन.

RMC Mixer – शहरातील वाहतूक कोंडी टाळणे, तसेच नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीबाबत प्रायोगिक स्वरूपात नवीन वाहतूक नियमन लागू केल्याचे आदेश मंगळवारी (दि. २८) काढले आहेत. मात्र, आरएमसी प्लँट चालकांसाठीची नियमावली अद्यापही बनवली नसल्याने नियमावलीचे घोंगडे भिजत पडले आहे.
याबाबत प्लँटचालकांसह पीडित नागरिकांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना विचारले असता, लवकरच नियमावली तयार होईल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचना, तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हे नवे आदेश निर्गमित केले आहेत.
हे आदेश प्रायोगिक तत्त्वावरच लागू केले आहेत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए, दोन्ही महापालिका आणि पोलिसांची वाहतूक शाखा यांच्याशी बोलून समन्वयाने नवी नियमावली तयार केली जाईल, असे पीडित नागरिक आणि प्लँटचालकांना सांगितले होते. मे मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पंधरा दिवसांत नियमावली तयार करू, असे सांगितले होते. त्यानंतर आरएमसी प्लँटचालकांनी पाठपुरावा केल्यानंतर ही तारीख ३० जून ठरली.
नवे प्रायोगिक आदेश
– मिक्सर वाहनांना शनिवार आणि रविवार सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रेड झोनसह पुणे शहर हद्दीत वाहतूक परवानगी.
– जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर, जड वाहने, स्लो-मुव्हिंग वाहनांना याचा लाभ नाही.
– हा आदेश प्रायोगिक स्वरूपात असून, आवश्यकतेनुसार फेरबदल केले जाणार.
– मिक्सर वाहनांवर ३६० अंश कॅमेरा प्रणाली, बॅक कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, वाहनासोबत क्लिनर अथवा चालक सहाय्यक बंधनकारक.
– प्रत्येक आरएमसी प्लँटमध्ये डी.डी. मशिन ठेवून, वाहन बाहेर पडण्यापूर्वी तपासणी आवश्यक.






