Pune Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी! सजावटीचे आणि पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
Pune Ganeshotsav: वीकेंड अन् सणाची खरेदी एकत्र आल्याने कोंडीत भर; पुढील दोन दिवस मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख रस्ते बंद राहण्याची शक्यता

Pune Ganeshotsav – गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य तसेच उत्सवासाठी आवश्यक वस्तूंच्या अंतिम खरेदीसाठी शनिवारी मोठ्या संख्येने पुणेकर मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये दाखल झाले. त्यामुळे मध्यवर्ती पुण्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागला. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आवश्यक असलेली बहुतांश खरेदी बरीच आधी सुरू झाली असली तरी शनिवारपासून या खरेदीने खरा जोर धरला. नागरिकांनी घरगुती गणपतीसाठी मूर्ती, सजावटी आणि पूजेचे साहित्य मध्यवर्ती भागातील बाजारपेठांकडे धाव घेतली.
त्यामुळे नेहमीच्या शनिवारच्या वाहतुकीत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची भर पडल्याने कोंडीत आणखी वाढ झाली. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख बाजारपेठांच्या परिसरात मोठी गर्दी दिसून आली. या भागात नागरिकांची पायी होणारी वर्दळही वाढल्याने वाहनांची वाहतूक संथ झाली.
गर्दीची तीव्रता लक्षात घेऊन शिवाजी रस्त्यावर वेळोवेळी वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यताही आहे. पुण्यातील शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि कुमठेकर रस्ता या प्रमुख मार्गांवरही वाहतूक कोंडीचा परिणाम जाणवला. बाजारपेठांकडे जाणाऱ्या वाहनांसह नेहमीच्या शनिवारच्या प्रवासातील वाहनांची संख्या मोठी असल्याने या मार्गांवरही वाहतूक संथ झाली.
पुढील दोन दिवसांत वाहतूक कोंडीची शक्यता
दरम्यान, आज मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली असली तरी गणेशोत्सवापूर्वीची मुख्य खरेदी अद्याप बाकी असल्याने रविवारी आणि सोमवारी बाजारपेठांमध्ये आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विशेषतः गणेशमूर्ती घरी नेणे, सजावटीचे साहित्य आणि पूजा साहित्याची खरेदी करण्यासाठी शेवटच्या दोन दिवसांत नागरिकांची मोठी वर्दळ अपेक्षित आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन
पुढील दोन दिवसांत होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांनी शक्यतो खासगी वाहने घेऊन मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये जाणे टाळावे. वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन मेट्रो, पीएमपीएमएल बस तसेच अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास बाजारपेठांच्या परिसरातील वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होण्याची शक्यता आहे.






