Pune District : इंद्रायणी दगडी घाटावरील उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
Pune District : विशेषतः गर्दीच्या वेळी एखादे लहान मूल किंवा नागरिक चेंबरमध्ये पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आळंदी : आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या दगडी घाटावरील एका चेंबरचे झाकण गायब झाल्याने भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्या चेंबरमुळे अपघाताची भीती वाढली असून, नगरपरिषद प्रशासनाने तातडीने झाकण बसवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व भाविकांकडून करण्यात येत आहे.
इंद्रायणी नदीच्या घाटावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी व स्नानासाठी येत असतात. वृद्ध, महिला आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात उघडे चेंबर धोकादायक ठरत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी एखादे लहान मूल किंवा नागरिक चेंबरमध्ये पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय, उघड्या चेंबरमधून प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात आत जात असल्याने चेंबर तुंबण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेसह जलनिस्सारण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या उघड्या चेंबरचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर या समस्येकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. भाविकांची सुरक्षितता आणि घाटावरील स्वच्छता लक्षात घेऊन संबंधित चेंबरवर तातडीने झाकण बसवावे तसेच घाट परिसरातील सर्व चेंबरची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.





