PSL 2025 : पाकिस्तानात भयानक अनुभव; बांगलादेशच्या रिशाद हुसेनचा धक्कादायक खुलासा

बीसीसीआयनंतर पीसीबीने ९ मे रोजी पीएसएल पुढे ढकलण्याची घोषणा केली. त्यानंतर पीएसएलमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंना युएईला नेण्यात आले, तेथून त्यांनी त्यांच्या देशात परतण्यासाठी कनेक्टिंग फ्लाइट पकडली. दुबई विमानतळावर पोहोचल्यानंतर खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बांगलादेशचा लेगस्पिनर रिशाद हुसेनने परदेशी क्रिकेटपटू कसे भीतीच्या छायेत जगत होते? याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
Remaining Matches of the HBL PSL X Postponed
Details here ➡️ https://t.co/gkI03S5MbJ#HBLPSLX
— PCB Media (@TheRealPCBMedia) May 9, 2025
दुबई विमानतळावर घेतला सुटकेचा निश्वास –
दुबई विमानतळावर पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रिशाद हुसेन म्हणाला. अलहमदुलिल्लाह, आम्ही एका संकटावर मात केली आहे आणि दुबईला पोहोचलो आहोत आणि आता मला बरे वाटत आहे. तो म्हणाला की, त्याचा देशबांधव आणि वेगवान गोलंदाज नाहिद राणा, जो पीएसएलमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीकडून खेळतो, तो इतका घाबरला होता आणि तणावात होता की त्याने बोलणे बंद केले होते. तो पूर्णपणे गप्प झाला होता. तर इतर परदेशी खेळाडू खूप घाबरले होते.
हेही वाचा – IPL 2025 पुन्हा सुरू करण्यासाठी BCCI सज्ज! ‘या’ तीन शहरांमध्ये होणार उर्वरित सामने
रिशाद हुसेनने सांगितला पाकिस्तानातील अनुभव –
रिशाद हुसेन पुढे म्हणाला, ‘सॅम बिलिंग्ज, डॅरिल मिशेल, कुशल परेरा, डेव्हिड व्हीजे आणि टॉम करन सारखे परदेशी खेळाडू खूप घाबरले होते. दुबईत उतरताच, मिशेलने मला सांगितले की तो पुन्हा कधीही पाकिस्तानला जाणार नाही, विशेषतः अशा परिस्थितीत. एकंदरीत, ते सर्व घाबरले होते. आम्ही पाकिस्तानातील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या २० मिनिटांतच क्षेपणास्त्र हल्ला झाला. ही बातमी भयावह आणि दुःखद होती आणि आता दुबईत पोहोचल्यानंतर आम्हाला दिलासा मिळाला आहे. गेल्या काही रात्रींपासून माझे कुटुंब झोपू शकले नाही.’





