BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय; आशिया कपमधून भारताची माघार!

BCCI Withdraws from Asia Cup : भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या काळात वाढलेल्या तणावानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी आशिया कपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप आणि पुरुष आशिया कपमधून माघार घेण्याच्या निर्णयाची माहिती बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) दिली आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, बीसीसीआयचा हा निर्णय पाकिस्तान क्रिकेटला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. एसीसीचे नेतृत्व सध्या पाकिस्तानचे मोहसिन नक्वी करतात, जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष देखील आहेत.
🚨 INDIA OPTS OUT FROM ASIA CUP. 🚨
– The BCCI decides to not participate in the upcoming Asia Cup. (Express Sports). pic.twitter.com/DARU2lameb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2025
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘भारतीय संघ एसीसीद्वारे आयोजित केलेल्या आणि ज्याचे प्रमुख पाकिस्तानी मंत्री असतात अशा स्पर्धेत खेळू शकत नाही. हे प्रकरण देशाच्या भावनांशी संबंधित आहे. आम्ही आगामी महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेतल्याबद्दल एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या स्पर्धांमधील आमचा भविष्यातील सहभाग देखील थांबवण्यात आला आहे. आम्ही भारत सरकारच्या सतत संपर्कात आहोत.’
आशिया कप पुढे ढकलला जाऊ शकतो –
बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कपवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा सध्यासाठी पुढे ढकलली जाऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयला माहिती आहे की आशिया कपचे आयोजन भारताशिवाय शक्य नाही कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे बहुतेक प्रायोजक भारतातील आहेत. शिवाय, भारत-पाकिस्तान या किफायतशीर सामन्याशिवाय, प्रसारकांना आशिया कप आयोजित करण्यात रस असणार आहे.





