Rishabh Pant Run Out : ऋषभ पंतसोबत काय झालं? एकानावर नशिबाचा क्रूर खेळ; मुकेश कुमारच्या एका स्पर्शाने झाला घात
Rishabh Pant Run Out : आजच्या सामन्यात ऋषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला, त्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

Rishabh Pant Run Out LSG vs DC IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या पाचव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात झालेल्या लढतीत एका दुर्दैवी आणि विचित्र धावबादच्या (Run Out) प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इकाना स्टेडियमवर लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत ज्या पद्धतीने बाद झाला, त्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.
एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात अत्यंत धक्कादायक झाली. सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेला कर्णधार ऋषभ पंत नशिबाच्या खेळाचा बळी ठरला. ९ चेंडूत ७ धावांवर खेळत असताना पंतला ज्या पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले, ते पाहून मैदानावर उपस्थित असलेला प्रत्येक प्रेक्षक अवाक झाला.
नेमकं काय घडलं?
Presence Of Mind Zero 🤦🏻♂️
Rishabh Pant Disaster Form Continue In IPL Since 2025 To Now…..🫣
Innings- 13
Runs- 269
Average- 24.5
Strike Rate- 133.0
50s- 1
100s- 1
Dot % – 45.0 🤯And Now As Opener > 7(9) Runout 🤷🏻♂️#RishabhPant #LSGvDC @LucknowIPL 👀 pic.twitter.com/aDnpECpPYt
— Kohlified🌠 (@jatt_on_x) April 1, 2026
ही घटना लखनऊच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने मिचेल मार्शला चेंडू फेकला. मार्शने समोरच्या दिशेला एक जोरदार ‘ड्राइव्ह’ मारला. चेंडू थेट खेळपट्टीच्या मधून जात असताना मुकेश कुमारने डावा हात लावून तो रोखण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, चेंडू मुकेशच्या बोटांना स्पर्श करून थेट नॉन-स्ट्रायकर एंडच्या स्टंप्सला जाऊन धडकला. त्यावेळी ऋषभ पंत धाव घेण्यासाठी क्रीजच्या बराच बाहेर निघून आला होता. रिप्लेमध्ये तो स्पष्टपणे बाहेर असल्याचे दिसले आणि त्याला ‘रन आऊट’ घोषित करण्यात आले.
लखनऊची घसरगुंडी –
ऋषभ पंतच्या या अनपेक्षित विकेटमुळे लखनऊची लय बिघडली. अवघ्या १९ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर लखनऊचा संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. यानंतर अवघ्या ७१ धावांतच अर्धा संघ तंबूत परतला. एडेन मार्करम (११), आयुष बडोनी (०) आणि निकोलस पूरन (८) यांनी निराशा केली. मिचेल मार्शने ३५ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. एकाना स्टेडियमवर दिल्लीच्या गोलंदाजांनी लखनऊच्या फलंदाजांची अक्षरशः पिसं काढली आहेत.





