Rishabh Pant : ऋषभ पंतने मोडला ॲडम गिलख्रिस्टचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड
कसोटी क्रिकेटमधील एकूण षटकारांच्या आकडेवारीतही पंत (Rishabh Pant) वेगाने पुढे सरकत असून त्याच्या नावावर आता ९८ षटकार झाले आहेत.

Rishabh Pant : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या दिवसापासूनच भारतीय फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.
जिथे एका बाजूला देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावले, तर दुसऱ्या बाजूला आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या बॅटची जादू दाखवत क्रिकेट जगताला चकित केले. पहिल्या दिवशी २७ धावांवर नाबाद राहिलेल्या पंतने डावाच्या ६८ व्या षटकात असा एक फटका मारला, ज्याने थेट क्रिकेटच्या विक्रमांच्या पानात स्वतःचे नाव कोरले.
श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या ६८ वे षटक टाकत असताना ऋषभ पंतने (Rishabh Pant) लाँग-ऑनच्या दिशेने एक गगनभेदी षटकार खेचला. हा केवळ एक षटकार नव्हता, तर परदेशी भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये पंतच्या बॅटमधून निघालेला ५७ वा षटकार ठरला.
या एकाच फटक्यासह पंतने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज ॲडम गिलख्रिस्टचा अनेक वर्षांचा महाविक्रम मोडीत काढला. गिलख्रिस्टने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत (१९९९ ते २००८) ऑस्ट्रेलियाबाहेर ५६ कसोटी षटकार मारले होते, ज्यांना आता पंतने मागे टाकले आहे.
परदेशात कसोटी खेळताना सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीत ऋषभ पंत आता थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत अव्वल स्थानी इंग्लंडचा बेन स्टोक्स असून त्याच्या नावावर परदेशात ६९ षटकारांची नोंद आहे.
एकंदरीत कसोटी क्रिकेटमधील एकूण षटकारांच्या आकडेवारीतही पंत (Rishabh Pant) वेगाने पुढे सरकत असून त्याच्या नावावर आता ९८ षटकार झाले आहेत. ज्यात बेन स्टोक्स (१३८), ब्रँडन मॅक्युलम (१०७) आणि ॲडम गिलख्रिस्ट (१००) यांचा समावेश आहे. पंतच्या या विक्रमी खेळीमुळे गॉल कसोटीत भारताची पकड आणखी मजबूत झाली आहे.






