पिंपरी | जप्त केलेले वजनकाटे, माल परत द्या

पिंपरी ( प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचा मनमानी कारभार टपरी, पथारी, हातगाडी व्यावसायिकांना डोकेदुखी ठरत आहे. कृष्णा नगर भाजी मंडई येथे बुधवारी (दि. २५) फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अन्यायकारक कारवाई सुरू होती.
ही कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाहनांना टपरी, पथारी हातगाडी पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी खो घातला.
अन्यायकारक कारवाई थांबविण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला. टपरी पाथरी हात गाडी पंचायत विभागीय महिला अध्यक्ष नाणी गजरमल व शहर कार्याध्यक्ष इम्तियाज बागवान यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण पथकाची गाडी अड.िवण्यात आली.
पथारी हातगाडी धारकांनी ठिय्या आंदोलन केल्याची माहिती मिळताच अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत कारवाईला विरोध केला.
टपरी, पथारी, हातगाडीधारकांचा महापालिकेने सर्व्हे केला आहे. मात्र काहींना अद्याप परवाने दिले नाहीत. हातावरचे पोट असल्याने कष्ट करून अनेक जण आपला उदरनिर्वाह करत आहेत.
मात्र त्यांना महापालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कृष्णानगर भाजी मंडई येथे ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे कर्मचारी वाहनासह दाखल झाले होते.
व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करत साहित्य, माल जप्त केला. या अन्यायकारक कारवाईचा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची वाहने अडविली. आमचे साहित्य, माल परत देण्याची मागणी केली.
दरम्यान टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंत, शहराध्यक्ष रमेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
या वेळी रस्त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना देखील क्षेत्रीय अधिकारी यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक हेतू परस्पर गोरगरीब, कष्टकरी मागासवर्गीय, बहुजनांना त्रास देण्यासाठी मनमानी पद्धतीने अतिक्रमण कारवाई केली. असे व्यावसायिकांनी सांगितले.
या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फेरीवाल्यांसाठी कायदा केला आहे. एका बाजूला कायद्याची अंमलबजावणी चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला अतिक्रमण कारवाई सुरू आहे. हा अन्याय् आहे.





