Pimpri : महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये हेल्मेट सक्तीला अपवाद का?

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. मात्र महापालिकेच्या इतर आठ क्षेत्रीय कार्यालयांत मात्र याबाबत कुठलीही अंमलबजावणी नाही, हे चित्र पाहून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हेल्मेट सक्तीचा नियम अपघात टाळण्यासाठी आहे, मात्र मनपाच्या कार्यालयांमध्ये नियमांची शिथिल अंमलबजावणी ‘डबल स्टँडर्ड’ असल्याचे नागरिकांचे मत आहे.
मुख्यालयात हेल्मेट नसेल तर जणू काही लगेच अपघात होतो आणि जीव गमवावा लागतो, असा मनपाचा अप्रत्यक्ष संदेश असल्याचा टोला काही नागरिकांनी लगावला आहे. पण उर्वरित आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अपघात होतच नाहीत का? तिथे माणसं अमर आहेत का? असा संतप्त सवालही विचारण्यात येतो.
सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी यासंदर्भात विचारलेल्या पत्रात “आयुक्तांच्या आदेशाला मानाचा मुजरा…” अशा शब्दांत उपरोध व्यक्त केला आहे. एकाच शहरात वेगवेगळे नियम कसे लागू होतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचे नियम सर्वत्र समान असले पाहिजेत, अन्यथा अशा अर्धवट अंमलबजावणीमुळे महापालिकेच्या निर्णयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.





