नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी २७ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष पोलीस पथकाने ही धडक कारवाई करत ६ आरोपींना अटक केली असून, चार आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे करत असून, १६ जुलै रोजी त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे नेवासा खुर्द येथील कापूर डोह, ज्ञानेश्वर मंदिर परिसरात सायंकाळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान, तिघा चालकांना अटक करून त्यांच्याकडील तीन वाहने — दोन ढंपर आणि एक टेम्पो — तसेच त्यामधील वाळू जप्त करण्यात आली. पकडलेल्या वाहनांमध्ये एक टाटा ढंपर (MH 17 AG 4174) १०.५० लाख रुपये किमतीचा, दुसरा बिगर नंबरचा ढंपर १०.५० लाख रुपये किमतीचा आणि एक ७०९ मॉडेलचा टेम्पो (MH 11 T 846) ६ लाख रुपये किमतीचा आहे. या वाहनांमध्ये एकूण ४ ब्रास वाळू आढळून आली. एकूण मुद्देमालाची किंमत २७.१६ लाख रुपये आहे. गुन्हा नेवासा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम ३०५ (ई), ३(५) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या डीवायएसपी संतोष खाडे यांच्यासह पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शेवगाव विभाग) डॉ. सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी केले. या कारवाईत विशेष पोलीस पथकातील पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जून बनकर, सुनील पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, पोकॉ सुनील दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दीपक जाधव आणि जालिंदर दहिफळे यांचा समावेश होता. फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.