Pimpri : दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी २ कोटींचा खर्च

पिंपरी : महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण कऱण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी खासगी कंपनीला पायघड्या घातल्या असून तब्बल दोन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
शहरातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनमानाचे सर्वेक्षण कऱण्यात येणार आहे. त्यासाठी १४ जानेवारी २०२५ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये दोन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. मात्र, त्यामधील एक कंपनी अपात्र ठरली तर पात्र असलेल्या मे. महात्मा गांधी सेवा संघ, औरंगाबाद यांनी लघुत्तम प्रती दिव्यांग व्यक्ती १८० रुपये दर सादर केला.
त्यानंतर मुख्यलेखा परीक्षण विभागाने संबंधित संस्थेला आणखी किती दर कमी करू शकता याबाबत विचारणा केली. त्यानंतर संस्थेने प्रती दिव्यांग व्यक्ती १३६ रुपये दर सादर केला. शहरामध्ये १ लाख ५० हजार दिव्यांग व्यक्ती गृहीत धरण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या कामासाठी २ कोटी ४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामाची मुदत पाच महिन्यांची असणार आहे. त्या कामास व खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीमध्ये मान्यता दिली आहे.





