पीएमसी बॅंकेवरील निर्बंधात झाली वाढ

मात्र, ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी काढता येणार
मुंबई –पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील निर्बंधात रिझर्व्ह बॅंकेने सहा महिन्यांची वाढ केली आहे. आता 22 डिसेंबर 2020 पर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.
असे असले तरी बॅंकेच्या ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बॅंकेने केला असून आता या बॅंकेच्या ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. अगोदर ही मर्यादा 50 हजार रुपये इतकी होती. या बॅंकेत काही गैरव्यवहार झाले होते. बॅंकेने दिलेल्या कर्जाची रक्कम कमी दाखविण्यात आली होती.
त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने 23 सप्टेंबर 2019 रोजी या बॅंकेवर निर्बंध लागू केले होते. आता रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे या बॅंकेतील 84 टक्के ठेवीदारांना रक्कम परत मिळणार आहे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. या बॅंकेने पूर्ण क्षमतेने काम करावे यासाठी रिझर्व्ह बॅंक या बॅंकेच्या प्रशासनाबरोबर प्रयत्न करीत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे या प्रयत्नांमध्ये अडथळे येत आहेत.





