Foreign Exchange Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात 10 अब्ज डॉलरची घट; खनिज तेलाच्या भडकलेल्या दरांचा अर्थव्यवस्थेला फटका
Foreign Exchange Reserves: विशेष म्हणजे या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य या आठवड्यात 3.6 अब्ज डॉलरने कमी होऊन 113.5 अब्ज डॉलर इतके झाले आहे.

Foreign Exchange Reserves: मार्च 27 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 10.28 अब्ज डॉलरने कमी होऊन 688 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. या अगोदरच्या आठवड्यातही भारताकडील परकीय चलन साठा 11.4 अब्ज डॉलरने कमी झाला होता. त्यामुळे या आघाडीवर चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत भारताची परकीय चलनविषयक परिस्थिती कमालीची बळकट होती. 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 728.49 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराण विरोधात हल्ला केला. त्यानंतर खनिज तेलाचे दर 72 डॉलरवरून 120 अब्ज डॉलरपर्यंत वाढले होते.
भारताला खनिज तेलासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन लागते. खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे भारताला या कालावधीत खनिज तेल खरेदीसाठी डॉलरचा वापर करावा लागत आहे. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के खनिज तेल आयात करीत असल्यामुळे खनिज तेल आयात करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत परकीय चलन साठ्यावर याचा परिणाम झाला असल्याचे सांगितले जाते.
भारताकडे परकीय चलन साठ्यावर परिणाम झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यावर झालेला असून रुपया सध्या निचांंकी पातळीवर गेला आहे. अशा परिस्थितीत भारताला आयातीसाठी जास्त खर्च लागत आहे. त्यामुळे आयात वस्तू महागात पडत आहेत. पेट्रोल- डिझेलच्या किमती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या वाढविल्यामुळे भारतामध्ये आगामी काळात महागाई वाढण्ची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य या आठवड्यात 3.6 अब्ज डॉलरने कमी होऊन 113.5 अब्ज डॉलर इतके झाले आहे. याचाही भारताच्या एकूण परकीय चलनाच्या मूल्यावर परिणाम झाला.




