Pimpri News: दस्त नोंदणीस नकार, चौकशीचे आदेश
Pimpri News: ऑनलाइन टोकन घेऊन वेळ निश्चित करून पुन्हा तोच दस्त सादर

पिंपरी – विक्रीखताची नोंदणी करण्यास नकार दिल्याप्रकरणी दुय्यम निबंधक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पिंपरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. वाघमारे यांनी दुय्यम निबंधका कडून तसेच त्यांचे वरिष्ठ सह-जिल्हा निंबंधकांकडून खुलासा मागविला आहे, अशी माहिती अॅड. शिवनारायण गोयल यांनी दिली.
जेव्हा फिर्याद सरकारी कर्मचारीच्या विरुद्ध केली जाते तेव्हा त्या कर्मचारीने केलेलं कृत्य कायदेशीर आहे अगर नाही या बाबत त्यांच्या वरिष्ठांकडून देखील खुलासा मागविला जातो म्हणून सह जिल्हा निबंधक पुणे शहर यांच्या कडून तसा खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत.
अॅड. शिवनारायण गोयल यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक हवेली क्र. २६, म्हाडा कॉम्प्लेक्स पिंपरी येथील संबंधित सह दुय्यम निबंधक सोनल मेन्घे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, ३० जून २०२५ रोजी विक्रीखत नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करण्यात आले होते, मात्र दस्त नोंदणी करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर ३१ जुलै २०२५ रोजी ऑनलाइन टोकन घेऊन वेळ निश्चित करून पुन्हा तोच दस्त सादर करण्यात आला.
तरीही नोंदणी करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, हाच दस्त २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुसऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर करून नोंदविण्यात आला असून तशी नोंद 7/12 सदरी देखील झाली आहे.
या प्रकरणी अॅड. गोयल यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करूनही निर्धारित मुदतीत माहिती मिळाली नसल्याचा आरोप केला आहे.
दस्त नोंदणीसाठी केलेले प्रयत्न, ऑनलाइन टोकन, माहिती अधिकाराचे अर्ज आणि अन्य कागदपत्रे त्यांनी न्यायालयात सादर केली आहेत. या कागदपत्रांची दखल घेत ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यावेळच्या संबंधित प्रभारी सह दुय्यम सोनल मेन्घे यांच्या भूमिकेबाबत चौकशी करून अहवाल मागविण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच दुय्यम निबंधक यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश झाले आहे. या अहवालानंतर पुढील न्यायालयीन कार्यवाही होणार आहे.
Bushra Bibi : बुशरा बिबी यांची नजर खालावली; इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल





