Kunbi Certificate : मराठा तरुणाला कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळणार? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात पाच दिवसांचे आमरण उपोषण करणारे नेते मनोज जरांगे यांच्या मागणीला यश आले आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयानुसार, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि प्रक्रिया काय आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया
1. शालेय कागदपत्रांचा वापर
आपल्या रक्तातील नातेवाईकांचा (उदा., वडील, आजोबा, चुलते) प्राथमिक शाळेतील प्रवेश उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) काढावा. या कागदपत्रांवर कुणबी जातीची नोंद आहे का, याची पडताळणी करावी. ही नोंद कुणबी जातीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.
2. स्वातंत्र्यपूर्व नोंदी (कोतवाल बुक/गाव नमुना नं. १४)
स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्म-मृत्यू नोंद त्यांच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जायची. या नोंदी तहसील कार्यालयात उपलब्ध असतात. १ डिसेंबर १९६३ नंतर कोतवाल पद महसूल खात्यात विलीन झाल्याने हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे सोपवण्यात आले. आपल्या रक्तनातेवाईकाच्या जन्म किंवा मृत्यूच्या गावातील तहसील कार्यालयात अर्ज करून कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ ची प्रत मागवावी आणि त्यात कुणबी जातीची नोंद आहे का, हे तपासावे.
3. महसुली कागदपत्रे
रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या जुन्या महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख असल्यास तो पुरावा म्हणून वापरता येईल. यामध्ये वारस नोंदी (६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा लागू होण्यापूर्वीचे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा इतर कोणतेही महसुली कागदपत्र ग्राह्य धरले जाईल. ही कागदपत्रे तहसील कार्यालयातून काढता येऊ शकतात.
4. शासकीय/निमशासकीय सेवेतील नोंदी
जर रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत असतील आणि त्यांच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर कुणबी जातीची नोंद असेल, तर त्याचा साक्षांकित उतारा पुरावा म्हणून सादर करता येईल.
5. आधीचे कुणबी प्रमाणपत्र
जर रक्तसंबंधातील नातेवाईकाने यापूर्वी कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवले असेल आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने ते वैध ठरवले असेल, तर ते प्रमाणपत्र आणि त्याचे पडताळणी प्रमाणपत्र देखील कुणबी जातीचा पुरावा म्हणून स्वीकारले जाईल.
कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्रता
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वी जन्मलेल्या रक्तसंबंधातील नातेवाईकांचा (उदा., वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, त्यांचे चुलते किंवा आत्या) कुणबी जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा पुरावा वरीलपैकी कोणत्याही स्वरूपात सादर केल्यास कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल.
सरकारच्या निर्णयाचे महत्त्व
मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ केल्याने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची शक्यता वाढली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र मिळवणे सोपे होईल, असा सरकारचा दावा आहे. मात्र, यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला असून, याबाबत वादही सुरू आहेत. तरीही, हा निर्णय मराठा आरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.





