Pune District : महिला सक्षमीकरण धोरण कागदोपत्रीच ?

पत्नी सरपंच; मात्र कारभारी पती धोरणावर विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित होणार
संभाजी महामुनी
दिवे – राज्यातील महिलांना राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांना पुरुषांचा बरोबरीने 50 टक्के आरक्षण मोठी क्रांती केली. त्यामुळे गावोगांवच्या महिलांना सरपंचपदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. गावच्या विकासाच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या; परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमुळे आजही कित्येक गावात महिला सबलीकरण केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे.
गावामध्ये महिला गावच्या सरपंचपदावर विराजमान असली तरी कारभार त्यांचे पतीच हाकताना दिसत आहेत. ग्रामपंचातीच्या मासिक सभा, ग्रामसभा, सामाजिक कार्यक्रम यामध्ये पत्नी केवळ नामधारी सरपंच तर निर्णय मात्र त्यांचे पतीच घेत आहेत. एवढेच काय, पण कित्येक ठिकाणी सह्यासुद्धा त्यांचे पती करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महिला सबलीकरण केवळ कागदोपत्रीच आहे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
संगमनेर तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी संपूर्ण राज्यातील अतिशय महत्त्वचा असा मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना पत्र लिहून नामधारी महिला सरपंच आणि महिला सबलीकरण बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी तारांकित प्रश्न क्रमांक 7710 विधिमंडळ मध्ये दाखल केला आहे. तसेच विधिमंडळ कामकाज समितीकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील नामधारी महिला सरपंच यांची माहिती मागवली आहे.
याबाबत 3 जुलै रोजी विधानसभा अधिवेशनात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. त्यामुळे राज्याचे ग्रामविकासमंत्री काय उत्तर देणार ? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे लेखी अर्ज देऊन राज्यातील नामधारी महिला सरपंच यांची आकडेवारी मागितली आहे. याचवेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
उपस्थित केलेले प्रश्न
राज्यातील काही अपवादात्मक गावांमध्ये महिला सरपंच स्वतः नेतृत्व सांभाळताना दिसत असल्या तरी बहुतेक ठिकाणी ग्रामसभा, मासिक बैठका पासून ते दैनंदिन निर्णयापर्यंत सर्व ठिकाणी सरपंच पती किंवा घरातील अन्य प्रतिनिधी कारभार पाहत असल्याचे मे 2025 मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे खरे आहे काय ?
काही ठिकाणी सरपंच महिलांच्या सह्याही त्यांच्या पतीकडूनच केल्या जात असून समाज माध्यमातील पत्रकांमध्येही सरपंच महिलेपेक्षा त्यांच्या पतीची नावे झळकताना दिसत आहेत असल्याने महिला सक्षमीकरण व आरक्षणाचा हेतू कागदोपत्रीच राहिलेला आहे?
नामधारी, रबरी शिक्के असलेल्या महिला सरपंच कोण?
आमदार अमोल खताळ यांच्या प्रश्नावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत समितीना तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रश्नांची भागवार उत्तरे पूरक टिपणीसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात यावर चर्चा होणार असून राज्यातील नामधारी आणि रबरी शिक्का म्हणून गावपातळीवर प्रसिद्ध असलेल्या महिला सरपंच कोण? याकडे लक्ष लागले आहे.
आम्हाला जिल्हा परिषदेकडून याबाबत माहिती मागविण्यात आली होती. तसेच ही माहिती तालुक्यातील संबंधित गावच्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून संकलित केली असून जिल्हा परिषदेकडे पाठवून दिली आहे.
– प्रणोती श्रीश्रीमाळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पुरंदर





