पिंपरी | मावळात यंदा भाताचे विक्रमी उत्पादन

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात यावर्षी उत्तम पाऊस आणि अनुकूल वातावरण असल्याने खरीप भात पीक अतिशय जोमात आले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना भाताचे विक्रमी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. तालुक्यात एकूण १२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे.
कृषी विभागाकडून वेळोवेळी झालेल्या मार्गदर्शनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञान व पद्धतीचा अवलंब केला होता.
यात चार सूत्री भात लागवड पद्धत, एसआरटी पद्धत, यांत्रिकी पद्धतीने लागवडी करत भात शेती करण्यात आली. वेळोवेळी मशागत केल्याने पीक देखील चांगले आले आहे.
बहुतेक शेतकऱ्यांनी यंदा इंद्रायणी वाणाचे भात लागवड केलेले दिसते. इंद्रायणी सोबत फुले समृद्धी, कोलम, आंबेमोहर, बासमती या वाणांचीही लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र सर्वाधिक ९५ टक्के भात लागवड ही इंद्रायणी भाताची झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
तालुक्यातील भात पीक सध्या अखेरच्या टप्प्यात आले आहे. परतीच्या पावसाने भाताचे दाणे चांगले भरले असून आठ ते दहा दिवसात भाताच्या काढण्या सुरू होतील, असे शेतकरी गणपतराव भानुसघरे, महेश कुडले, एकनाथराव गाडे, गोरख दाभाडे यांनी सांगितले.
भात कापणीला सुरुवात लवकरच
जून महिन्यात पावसाने ताण दिला होता. मात्र जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये सुमारे शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला.
त्यामुळे खरीप भात पीक अतिशय जोमात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले. तर, पुढील आठ ते दहा दिवसानंतर भात कापणी सुरू होईल, असे कृषी सहाय्यक अक्षय ढुमणे यांनी सांगितले.





