पुणे जिल्हा | गारदरातील कृषी विभागाचा बंधारा फुटला

राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – वरची भांबुरवाडी (ता. खेड) हद्दीतील गारदरा परिसरात 15 वर्षांपूर्वीचा कृषी विभागाने बांधलेला माती बंधारा गुरुवारी (दि. 25) फुटला. बंधारा फुटुन वाहिलेल्या पाण्यामुळे या शिवारात जाणार्या रस्त्याचे मोठे नुकसान झाले.
कृषी विभागाच्या वतीने हा बंधारा बांधण्यात आला होता. बंधार्यात साठणार्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींचा स्रोत वाढत होता. शिवाय परिसरातील आणि बंधार्याखालील शेती सिंचन या पाण्यावर अवलंबुन होते. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याची गरज भागत होती. तालुक्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस पडला.
वरची भांबुरवाडी येथील डोंगर परिसरात दोन बंधारे आहेत. वरचा बंधारा भरून पुराचे मोठे पाणी या बंधार्यात आल्यावर गुरुवारी दुपारी बंधार्याला मधोमध भगदाड पडुन बंधारा फुटला. त्यातून वाहणार्या पाण्याच्या प्रवाहात रस्ताही वाहुन गेला.
15 वर्षे झालेल्या माती बंधार्याची डागडुजी करावी अशी मागणी खेड कृषी विभागाकडे केली होती. मात्र देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आमच्याकडे तरतुद नाही असे सांगुन कृषी विभागाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सरपंच विजय थिगळे, काँग्रेसचे खेड तालुका माजी अध्यक्ष सुभाष गाढवे यांनी केला आहे.





