Satara | कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद सेस सन २०२४- २०२५ अंतर्गत पंचायत समिती, सातारा कृषि विभागामार्फत विविध शेती उपयोगी औजारांसाठी सातारा तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. काही बाबींसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करावयाचे आहेत.
उर्वरीत बाबीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ ऑगष्ट असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी केले आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी www.zpsatarascheme.com या वेबसाईट वर जावून अर्ज करावयाचा आहे. कृषि यांत्रिकीकरण- पेरणीयंत्र, पाचटकुट्टी, खोडवाकटर, पल्टी नांगर,ट्रॅक्टर चलीत रोटाव्हेटर,पॉवर विडर,२ एचपी विद्यूतचलीत कडबाकुट्टी या औजारांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचे आहेत.
कॅन्व्हास, एचडीपीई ताडपत्री, ट्रिपल पिस्टन स्प्रेअर्स इंजिन किंवा मोटारीसह, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप,सायकल कोळपे, ५ व ७.५ एचपी विद्यूत पंपसंच, ३ एचपी विद्यूत पंपसंच, ४ किंवा ५ एचपी डिझेल इंजिन, एचडीपीई (६३ एमएम, ७५ एमएम, ९० एमएम) पाईप किंवा पीव्हीसी पाईप (७५ एमएम, 90९० एमएम ), मधपेटीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचे आहेत.
ऑफलाईन पध्दतीने अर्ज पंचायत समिती सातारा येथील बारनिशीमध्ये अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून सादर करावयाचे आहेत. अर्जाचा नमुना पंचायत समिती, सातारा येथे पहावयास मिळेल, अशी माहिती सतीश बुध्दे यांनी दिली.
ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी ७/१२ व खाते उतारा (३ महिन्याच्या आतील), आधारकार्ड (सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली), रेशनकार्ड (सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली), बॅक पासबूक (राष्ट्रीयकृत बँक अगर जिल्हा मध्यवर्ती बँक सत्यप्रत स्वत: सांक्षाकित केलेली),
छोटे कुटुंब प्रमाणपत्र, कडबाकुट्टी- पशूधन विकास अधिकारी यांचा जनावरे असलेबाबत दाखला व घरगुती विद्युत बिल, पाईप व विद्युत पंपसंचासाठी- ७/१२ वर विहीर नोंद नसेल तर पाणी परवाना जोडण्यास हरकत नाही,
रोटाव्हेटर कृषि यांत्रिकीकरण, औजारासाठी- ट्रॅक्टरचे आर सी बुक सत्यप्रत स्वतः सांक्षाकित केलेली, डिझेल इंजिनासाठी- ७/१२ वर विहीर नोंद अथवा पाणी पाणी परवाना असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ राहील. तदनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. इच्छूक शेतकऱ्यांनी आवश्यक बाबीसाठी विहीत मुदतीत व सर्व कागदपत्रके जोडून अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सतिश बुध्दे यांनी केले आहे.





