Satara | ऑपरेटर नसल्याने पीएम किसान योजनेचे काम बंद

वडूज, {नितीन राऊत} – ‘कृषी विभागात डाटा ऑपरेटर नसल्याने शेतकरी बंधूंनो ऑपरेटर मिळत नाही तोपर्यंत पी एम किसान चे कोणतेच काम होणार नाही’ असा जाहीर फलक खटाव तहसील कार्यालयात असणाऱ्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयावर झळकतो आहे.
तालुक्यातील जनतेला या ठिकाणी येऊन ऑपरेटर नसल्यामुळे पुन्हा माघारी जावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज तहसील कार्यालयात शासकीय कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागतील नागरिकांची नेहमी वर्दळ असते. मात्र ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब ‘ या म्हणी चा प्रत्यय नेहमीच जनतेला येत असतो.
सध्या स्थितीला तर चक्क खटाव कृषी विभागाने एक सूचना फलकच लावलेला आहे. ज्याच्यावर स्पष्ट उल्लेख आहे की, शेतकरी बंधूंना सूचना. डाटा एंट्री ऑपरेटर नसल्याने दि. १ /७/२४ पासून ऑपरेटर मिळेपर्यंत पीएम् किसान योजनेची कामकाज बंद करण्यात येत आहे.
वास्तविक जिल्ह्यातील काही ठिकाणी पीएम किसान योजनेची कामे सुरळीत सुरू आहेत. मात्र, खटाव कृषी विभागाला अद्याप ऑपरेटर मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ऑपरेटर येईपर्यंत मूग गिळून गप्प राहणार अशा संतप्त प्रतिक्रिया सामान्य जनता व्यक्त करत आहेत.
स्वतःचे ‘राज’ करून शेतकऱ्यांना ‘हुल ‘ देणाऱ्या या अधिकाऱ्याने कृषी विभागाचा कारभार सुधारावा.. खटाव तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने निसर्गाची साथ नसल्याने त्यातच अशा अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे शेतकरी राजा जास्तच संकटात जाऊ लागला आहे.
त्यामुळे जिल्ह्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या विषयावर तोडगा काढून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
याबाबत कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्याला माहिती विचारली असता एक तारखेच्या दरम्यान ऑपरेटर उपलब्ध होईल असे सांगण्यात आले.





