पिंपरी | पारंपारिक लोकगीते गाऊन घेतला जातोय भात लावणीचा आनंद

कान्हे, {सोपान येवले} : मावळ तालुक्यात प्रामुख्याने भात शेती केली जाते. भातशेती करताना भात रोपांची लागवड म्हणजेच लावणीच्या वेळी महिला वर्ग पारंपारिक लोकगीते, भक्तीगीते गाऊन शेतीकामाचा आनंद घेतात. गाणे म्हणत भात लागवड करण्याची ही पद्धती ‘भलरी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
उर्जा मिळते, उत्साह वाढतो –
आंदर मावळ, पवन मावळ या ग्रामीण भागामध्ये सध्या भात लागवडीचा अंतिम टप्पा सुरू आहे. मावळात भात शेतीमुळे एक आगळीवेगळी कृषी संस्कृती विकसित झाली असून यात भात लावणीवेळी पारंपारिक गाणी म्हणण्याची भलरी पद्धत रूढ आहे. लोकगीते गाऊन काम केल्याने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण तयार होते. कामासाठी नवी उर्जा मिळते, ज्यातून कामाचा वेग वाढतो, असे शेतकरी सांगतात.
मावळातील साते गावात सध्या भात लावणी सुरू आहे. अशात एका शेतात महिला पारंपारिक गीते गात शेतात फेर धरताना दिसून आल्या. स्थानिक बोली भाषेतील लोकगीते, भक्तीगीते गात महिला वर्ग शेतात लावणीचा आनंद घेत होत्या. एका महिलेने पुढे गाणे म्हणायचे आणि इतर स्त्रियांनी तिला साथ द्यायची, अशी ही परंपरा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही भलरी परपंरा हस्तांतरित होत आहे. वाडवडिलांनी आम्हाला शिकवली, सांगितली तीच गाणी तशीच आम्ही म्हणतो, असे एका शेतकरी महिलेने सांगितले.
विठू मला पंढरीला जाऊ दे
जनाबाईचे दर्शन येऊ दे रे
मला पंढरीला जाऊ दे
अशी विठूरायाला आळवणारी भक्तीगीते भात शिवारात गाताना महिला दिसतात. माहेरच्या माणसांची ओढ, त्यांचे प्रेम दाखविणारी गाणी, विठ्ठल आदी देवदेवतांच्या बद्दलची गाणी, गावशिवारातील प्रथा, कथा यांची गाणी हीच गीते शेतकऱ्यांच्या ओठी असतात. पारंपारिक तालासुरात गाणी म्हणत आपली शेतीकामे ही लोकं करतात.
आम्ही महिला शेतात काम करताना विरंगुळा निर्माण व्हावा यासाठी असली गाणी म्हणतो. विठ्ठलाची गाणी गात आम्ही भात लावणी करतो. ही गाणी गायल्याने ऊर्जा मिळते आणि कामाला वेग येतो. थकवा जाणवत नाही, सोबत देवाचं पण नामस्मरण होतं. – शिलाबाई येवले, शेतकरी महिला





