Keshavrao Bhosale Natyagruha: ‘केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारु’; हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Keshavrao Bhosale Natyagruha: नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
तसेच दोन दिवसातच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हे वैभव पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने आणि दिमाखात उभारण्यासाठी जास्तीत- जास्त निधी मिळवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करु, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरात बांधलेले केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक वैभवच. सन १९१२ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर उभारले होते.
गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा या नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत बहुतांशी नाट्यगृह जळून बेचिराख झाले. यानंतर आज हसन मुश्रीफ यांनी मुंबईहून थेट नाट्यगृह गाठले. जळून भस्मसात झालेल्या नाट्यगृहाची व खासबाग मैदान परिसराची त्यांनी पाहणी केली.
मुश्रीफ म्हणाले, आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोम देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी हे नाट्यगृह बांधले होते. ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी, मन सुन्न करणारी बाब आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
नाट्य कलाकारांना प्रोत्साहन, चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेले हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करणे किंबहुना याच्यापेक्षा अधिक चांगले, अद्ययावत पद्धतीने निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे.
यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील, तसेच या ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.





