woman life partner : ‘महिलेला स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार’; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
महिलेच्या स्वातंत्र्याचा सन्मान करत न्यायालयाने तिला तिच्या पतीसोबत राहण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

woman life partner – कोणत्याही सज्ञान महिलेला तिचा धर्म, जात किंवा आस्था काहीही असली तरी स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
एका २१ वर्षीय हिंदू महिलेने मुस्लिम तरुणाशी विवाह केल्यानंतर आपल्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निकाल दिला.
न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना आणि न्यायमूर्ती रंजीतसिंह राजा भोंसले यांच्या पीठासमोर या फौजदारी रिट याचिकेवर सुनावणी झाली. संबंधित महिला गेल्या चार-पाच वर्षांपासून एका २१ वर्षीय मुस्लिम तरुणाशी प्रेमात होती आणि दोन्ही कुटुंबांना या नात्याची कल्पना होती.
या जोडीने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी विवाह केला आणि त्यानंतर सुरक्षेसाठी पोलिसांशी संपर्क साधला होता. मात्र, धारावी पोलिसांनी कोणतीही कारवाई करण्यास नकार दिल्याचे महिलेने याचिका म्हटले आहे.
तसेच, आपले पालक आपल्याला जबरदस्तीने उत्तर प्रदेशला घेऊन गेले होते, असा दावाही तिने केला. मुंबईत परतल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव तिने आपल्या पतीसोबत राहण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महिलेतर्फे युक्तिवाद करताना वकील आर. के. मेंडडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ मधील शफीन जहां विरुद्ध अशोकन के. एम. या खटल्याच्या निकालाचा संदर्भ दिला.
आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार हा संविधानाच्या कलम २१ अंतर्गत जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे या निकालात स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून आणि पूर्णपणे नियमांनुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. महिलेच्या स्वातंत्र्याचा सन्मान करत न्यायालयाने तिला तिच्या पतीसोबत राहण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.






