एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागचे कारण समोर; पंतप्रधान मोदींची घेतली भेट, ‘या’ विषयावर झाली चर्चा

Eknath Shinde Meet PM Modi | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील धुसफूस समोर येत असताना शिंदे यांच्या आजच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अखेर दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींची भेट घेतल्याचे आणि या भेटीत काय चर्चा झाली? याविषयची सविस्तर माहिती सांगितली आहे.
दिल्लीत आलो तरी चर्चा होतात आणि शेतात गेलो तरी चर्चा
एकनाथ शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची ही भेट अचानक नव्हती. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी भेटलो. बिहार निवडणुकीमुळे त्यांचे दौरे असल्याने ते व्यस्त होते. आता दिवाळीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. मी दिल्लीत आलो तरी चर्चा होतात आणि मी शेतात गेलो तरी चर्चा होतात. चर्चा करणारे चर्चा करतात, त्यांच्या चर्चा सुरू असतात, पण मी माझं काम करत असतो.” पंतप्रधान मोदी हे देशासाठी जे काही काम करतात, त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान असल्याचे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुक देखील केले. Eknath Shinde Meet PM Modi |
यावेळी शिंदे यांना राज्यातील राजकीय मुद्यांवर चर्चा झाली का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिंदे म्हणाले की, “जेव्हा आम्ही भेटतो, तेव्हा पंतप्रधान मोदी विकासावर बोलत असतात. मग महाराष्ट्राच्या विकासावर असो किंवा देशाच्या विकासावर, भेटल्यावर विकासावरच चर्चा होत असते. तसेच आम्ही एनडीएचे घटकपक्ष आहोत, त्यामुळे मोदींकडून शिवसेनेला कायमच आदराचं स्थान मिळत आलेलं आहे”, असंही शिंदेंनी म्हटलं आहे. Eknath Shinde Meet PM Modi |
रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार?
भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धंगेकर आरोप करत आहेत. याबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले की, “महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये बेबनाव होईल असे कृत्य, वक्तव्य करू नये. धंगेकरांकडे जो पक्षाचा निरोप जायचा होता तो गेला आहे. धंगेकरांचे जे काही वक्तव्य आहे त्यासंबंधी मी त्यांच्याशी बोलेन,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा:





