भानसहिवरे गटात विरोधकांची उडणार दणादाण…. नेवासे पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार यांच्या राजकीय भूमीकेकडे लक्ष

नेवासे : नेवासे तालुक्यातील राजकारणात चाणाक्ष डावपेचांनी वरचढ ठरलेले माजी पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार यांच्या भूमिकेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीत भानसहिवरा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्याने जोजार यांच्या निर्णयाला विशेष महत्त्व आहे. ते कोणत्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी घेणार की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, याकडे राजकीय निरीक्षक आणि तालुका रणांगणातील नेते नजरे ठेवून आहेत.
सर्वसाधारण कुटुंबातून उदयास आलेले किशोर जोजार हे गरीबीच्या झळा सोसल्यानंतरही राजकारणात अनाहूत प्रवेश करून तळागाळातील नेते म्हणून ओळखले जातात. भानसहिवरा ग्रामपंचायतीत त्यांच्या पत्नी मिनाताई जोजार यांनी दोन वेळा सरपंचपद यशस्वीपणे सांभाळले. तसेच, गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विरोधकांकडून सत्ता खेचून आणत त्यांनी आपली राजकीय किमया दाखवली.
नेवासे तालुक्यात ‘तेल लावलेला पहिलवान’ अशी उपाधी मिळवलेल्या जोजार यांनी ग्रामपंचायत दोन वेळा जिंकली, पंचायत समिती निवडणुकीत बाजी मारली आणि उपसभापतीपद भूषवले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जोजार यांनी स्वतःसाठी तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण शेवटच्या क्षणी ‘थांबा आणि पहा’ची भूमिका घेऊन राजकीय सोंगट्या फिरवल्या.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची ही भूमिका कायम राहील की वेगळे बस्तान बसवून अपक्ष उतरणार, याकडे जाणकारांचे विशेष लक्ष आहे. भानसहिवरा जि.प. गटात जोजार यांचा खोलवर अभ्यास असून, ते नेहमीच सामान्य जनतेच्या मदतीला धावतात. यामुळे विरोधकांची ताकद त्यांच्या कामगिरीसमोर नगण्य ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेतील की…
गावकऱ्यांमध्ये आधीच जोजार यांच्या नावाची चर्चा जोर धरली असून, ते तालुक्यातील तुफानी व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले आहेत.जोजार यांच्या उमेदवारीने भानसहिवरा जि.प. गटात विरोधकांची दणादाण उडण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेतील की अपक्ष मैदानात धडक मारतील, याकडे तालुक्याचे डोळे लागले आहेत. जोजार यांच्या निर्णयाने या गटातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात, असे राजकीय निरीक्षक सांगतात.





