Amit Thackeray Meets Ashish Shelar : अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची घेतली भेट, काय केल्या मागण्या? मुंबईत नेमकं काय घडलं?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज (२३ ऑगस्ट) सकाळी ९:३० वाजता वांद्रे येथील भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीत अमित ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या कालावधीत (२७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५) शाळा आणि महाविद्यालयीन परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी केली.
यासंदर्भात त्यांनी शेलार यांना एक पत्रक सादर केले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी ठाम भूमिका मांडली आहे.
काय आहेत मागण्या?
- सर्व शाळा (SSC, CBSE, ICSE, CISCE, IB, IGCSE, MIEB, NIOS बोर्ड), महाविद्यालये (राज्य, अभिमत, खासगी विद्यापीठे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था) यांना सांस्कृतिक मंत्रालयामार्फत तातडीने आदेश जारी करावेत की, गणेशोत्सवाच्या कालावधीत (गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी) कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये. निश्चित केलेल्या परीक्षा तात्काळ रद्द करून पुढे ढकलाव्यात.
- गणेशोत्सवात परीक्षा घेणाऱ्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांवर तातडीने कारवाई करावी.
- गणेशोत्सवात विद्यार्थ्यांना मनापासून सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांचा सांस्कृतिक वारसाशी संबंध जपला जाईल.
अमित ठाकरे यांचा इशारा
अमित ठाकरे यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासह आणि समाजासह या सणाचा आनंद घ्यावा, ही त्यांची संस्कृतीशी नाळ जपण्याची जबाबदारी आहे. जर शालेय शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्यभरात तीव्र आंदोलन करेल आणि गणेशोत्सवात कोणत्याही परीक्षा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आशिष शेलार यांच्याशी चर्चा
भेटीनंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले, “आज आमची एकच मागणी होती की, २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मात्र, या काळात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा ठेवण्यात आल्या आहेत. अनेक विद्यार्थी आणि कुटुंबे गावी, विशेषत: कोकणात, गणेशोत्सवासाठी जातात.
त्यामुळे सर्वांना सण साजरा करता यावा, यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. ही मागणी थेट सांस्कृतिक मंत्र्यांकडे मांडणे योग्य वाटले.” उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवाच्या निमंत्रणाबाबत विचारले असता, अमित ठाकरे यांनी गूढ प्रतिक्रिया देत, “तुम्हाला सरप्राइज मिळेल,” असे सांगितले.





