राजकारणातून मोठी बातमी! अजित पवारांच्या वर्चस्वाला आव्हान? मुरलीधर मोहोळांची ‘या’ निवडणुकीत उडी

Muralidhar Mohol : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीची एक मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीसाठी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली नसली, तरी या वेळी निवडणुकीला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.
यंदाची ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी सोप्पी असणार नाही. यांचे कारण म्हणजे गेले तीन टर्म अजित पवार अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. २०१३ पासून या संघटनेचे ते अध्यक्ष राहिले असून त्यांनी पुन्हा एकदा म्हणजेच चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या तीन निवडणुकांत अजित पवारांना कोणत्याही तगड्या उमेदवाराचे आव्हान नव्हते, पण यावेळी मात्र त्यांच्यासमोर मुरलीधर मोहोळ यांच्यारुपाने मोठे आव्हान असणार आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
ही निवडणूक २ नोव्हेंबरला होणार असून 2025 ते 2029 या काळासाठी अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासोबत पदाधिकाऱ्यांची देखील निवडणूक पार पडणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी दादा विरुद्ध अण्णा असा राजकीय सामना होणार आहे. या निवडणुकीसाठी ६० सदस्य मतदान करणार असून संघटनेशी जोडलेल्या ३० संघटनांमधून प्रत्येक दोन जण मतदान करणार आहेत. यातून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
खरंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक ही जाहीर झाल्यापासून विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. पहिल्यांदा मतदानास पात्र संघटनेच्या नावावरून संघर्ष निर्माण झाला. कबड्डी, कुस्ती, जलतरण अशा प्रमुख संघटनांना सुरुवातीला या यादीतून वगळण्यात आले होते. या संदर्भात संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत कोर्टात धाव घेतली.





