RCB vs DC : ‘आम्हाला फलंदाजीसाठी…’, आरसीबीच्या पराभवासाठी कार्तिकने कोणाला धरले जबाबदार?

Dinesh Karthik says RCB Struggles on Slow Chinnaswamy Pitches : आयपीएलच्या चालू हंगामात घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीच्या फलंदाजांना संथ खेळपट्टीमुळे अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. यानंतर आरसीबी संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक दिनेश कार्तिक म्हणाला की, फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची मागणी असूनही, या हंगामात त्यांच्या संघाला चिन्नास्वामी स्टेडियमवर आव्हानात्मक खेळपट्ट्या मिळाल्या आहेत आणि संघ व्यवस्थापन लवकरच या संदर्भात क्युरेटरशी चर्चा करेल.
घरच्या मैदानावर कामगिरी राहिली खराब –
आरसीबीने गुजरातविरुद्ध ८ विकेट्सच्या मोबदल्यात १६९ धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. कार्तिकचा असा विश्वास आहे की त्याच्या संघाला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळायला हवा होता. येथील मैदान साधारणपणे मोठी धावसंख्या उभारण्यासाठी ओळखले जाते. विशेष म्हणजे आरसीबीने दुसऱ्यांच्या मैदानावर झालेला एकही सामना गमावलेला नाही.
दिनेश कार्तिक काय म्हणाला?
दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला, ‘पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही तयारीसाठी चांगली खेळपट्टी मागितली होती, पण आम्हाला अशी खेळपट्टी मिळाली, ज्यावर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. म्हणून आम्ही परिस्थितीनुसार आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पण आम्हाला क्युरेटरशू बोलायचे आहे. ते त्याचे काम चांगल्या प्रकारे करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.’
हेही वाचा – Virat Kohli : विराटने IPL 2025 दरम्यान घेतला मोठा निर्णय! तब्बल ३०० कोटींची ऑफर नाकारली
दोन्ही सामन्यांमध्ये सारखीच खेळपट्टी मिळाली –
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, ‘आतापर्यंत, येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्हाला सारखीच खेळपट्टी मिळाली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये लांब फटके आणि चौकार आणि षटकार खूप महत्त्वाचे असतात आणि सर्व भागधारकांना हे हवे आहे. टी-२० क्रिकेटचे स्वरूप असे आहे की त्यात जितक्या जास्त धावा होतील, तितकेच त्याचा प्रसारकाला फायदा होईल आणि चाहतेही आनंदी होतील.’
हेही वाचा – RCB vs DC : विराटचे कर्णधार पाटीदारशी मतभेद? दिनेश कार्तिकशी बोलतानाचा VIDEO व्हायरल
खेळपट्टी समजून घेणे आणि तिच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे –
आरसीबीचा मार्गदर्शक म्हणाला, ‘प्रत्येक खेळपट्टीवर आम्ही खेळण्याचा योग्य मार्ग कोणता आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. मला वाटत नाही की आम्हाला यासाठी कोणतीही विशिष्ट ब्लूप्रिंट तयार करावी लागेल. फक्त खेळपट्टी समजून घेणे आणि तिच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. पण अशा खेळपट्टीवर स्ट्राइक रोटेट करणे कठीण होते आणि मोठे शॉट्स खेळणे देखील सोपे नसते. मात्र, शेवटी टी-२० फॉरमॅट असल्याने तुम्हाला काही मोठे शॉट्स खेळावे लागतात आणि या प्रक्रियेत तुम्ही तुमची विकेट देखील गमावू शकता.’





