David Miller Record : ‘किलर’ मिलरचा २० व्या षटकात मोठा धमाका! पोलार्डला मागे टाकत थेट धोनीला दिलं आव्हान
David Miller Record : डेव्हिड मिलरने आयपीएलच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.

David Miller Sixes Record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या २६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अटीतटीच्या लढतीत आरसीबी (RCB) ६ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात दिल्लीच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे ‘किलर’ डेव्हिड मिलर. त्याने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारत केवळ संघाला विजय मिळवून दिला नाही, तर आयपीएलच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
मिलरने सलग दोन षटकार खेचत विजयावर केला शिक्कामोर्तब –
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने दिल्लीसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती, मात्र शेवटच्या दोन षटकांत २५ धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने आपला अनुभव पणाला लावला. २० व्या षटकात मिलरने सलग दोन षटकार खेचत सामना दिल्लीच्या खिशात टाकला. यादरम्यान त्याने पोलार्डला मागे टाकत धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली.
𝗠𝗮𝗴𝗻𝗶𝗳𝗶𝗰𝗲𝗻𝘁 𝗠𝗶𝗹𝗹𝗲𝗿 🫡
David Miller stands up tall and hits them big to take @DelhiCapitals to a thrilling victory 💥👏
Scorecard ▶️ https://t.co/vfJ6SccA9T#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvDC | @DavidMillerSA12 pic.twitter.com/I6FXLeOhXU
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
पोलार्डला मागे टाकले, आता फक्त धोनी पुढे –
आयपीएलमध्ये यशस्वी पाठलाग करताना (Successful Run Chase) २० व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मिलर आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने मुंबई इंडियन्सचा दिग्गज किरॉन पोलार्डचा (७ षटकार) विक्रम मोडीत काढला आहे. मिलरच्या नावावर आता २० व्या षटकात ९ षटकार झाले आहेत. या यादीत एमएस धोनी १४ षटकारांसह अव्वल स्थानी आहे. मिलरची धावांचा पाठलाग करतानाची आकडेवारी थक्क करणारी आहे; त्याने ३६ डावांत ९८.८१ च्या सरासरीने १०८७ धावा कुटल्या आहेत.
दिल्लीने रोखला आरसीबीचा विजयरथ –
डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. आपल्या घरच्या मैदानावर सलग पाच सामने जिंकणाऱ्या आरसीबीचा अश्वमेध अखेर दिल्लीने रोखला. २०२६ च्या हंगामातील सहा सामन्यांमधला आरसीबीचा हा दुसरा पराभव आहे. मिलरच्या या झंझावातामुळे आरसीबीच्या चाहत्यांचा हिरमोड झाला असून दिल्लीने गुणतालिकेत आपली स्थिती भक्कम केली आहे.





