Ravet Wall Collapse: बांधकाम की मृत्यूचा सापळा? रावेतमध्ये १०० फूट खोल खड्ड्यामुळे मोठी सोसायटी धोक्यात
Ravet Wall Collapse: रावेत येथील सोसायटीच्या पुढील आणि मागील बाजूस अवाढव्य खोदकाम; मुसळधार पावसामुळे ड्रेनेज फुटून माती वाहून गेल्याने भिंत भुईसपाट.

Ravet Wall Collapse – रावेत परिसरातील वाढत्या बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रावेत येथील सिल्वर ग्रेसीया सोसायटीच्या पुढील आणि मागील बाजूस सुरू असलेल्या मोठ्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या खोल उत्खननामुळे परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. खोदकामादरम्यान ड्रेनेजची पाइपलाइन फुटल्याची घटना घडली असून, त्यातच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीची माती वाहून जाऊन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली आहे.
त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथील रहिवाशी जीव मुठ्ठीत घेऊन राहत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामासाठी सुमारे ८० ते १०० फूट खोल खड्डे खोदण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे हे खड्डे पूर्णपणे पाण्याने भरले असून, पाण्याचा दाब आणि जमिनीची सतत होणारी धूप यामुळे आजूबाजूच्या परिसरावरही परिणाम होऊ लागला आहे.
संरक्षक भिंत कोसळल्याने सोसायटीच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की, खोदकामादरम्यान ड्रेनेज पाइपलाइन फुटल्यामुळे परिसरात अतिरिक्त पाण्याचा प्रवाह निर्माण झाला. त्यात पावसाचे पाणी मिसळल्याने मातीची पकड कमकुवत झाली आणि अखेर संरक्षक भिंत कोसळली. वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी जमीन खचण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
सध्या खोल खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था असल्याबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स, संरक्षक जाळी, इशारा फलक आणि रात्री प्रकाश व्यवस्था नसल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्रीच्या वेळी या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.
स्थानिकांनी सांगितले की, पावसाळ्यात अशा खोल उत्खननाच्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असते. मात्र, सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही ढिलाई झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा. तसेच मर्यादेपेक्षा जास्त व काळजी न घेता खोदकाम केल्याने संबंधित विकसकावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
नागरिकांनी ड्रेनेज पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करणे, कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे पुनर्बांधकाम करणे, उत्खननाच्या ठिकाणी मजबूत संरक्षक व्यवस्था उभारणे, पावसाचे पाणी उपसण्याची व्यवस्था करणे आणि संपूर्ण परिसराची तांत्रिक तपासणी करून भविष्यात कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
“बांधकाम विकासासाठी असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होता कामा नये. आमच्या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खोल खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, एखादा अपघात होण्याची भीती कायम आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी आणि प्रशासनाने रहिवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी देत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.”
– प्रशांत कुर्णवाल (रहिवासी, सिल्वर ग्रेसीया सोसायटी)





