PCMC News: महापालिकेत खळबळ! बालवाडी साहित्याच्या ८० लाखांच्या खरेदीची फाईल गायब? अधिकाऱ्यांची उडवाउडवी
PCMC News: प्राथमिक शिक्षण विभागाच्या मागणीवरून बालवाडी विद्यार्थ्यांच्या लेखन साहित्यासाठी ७९.३८ लाखांची निविदा मंजूर; मात्र मध्यवर्ती भांडार विभागातून फाईलच बेपत्ता.

PCMC News – महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने ८० लाख रुपयांच्या साहित्याची निविदा काढली. हे साहित्य बालवाडीमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, हे साहित्य काय आहे? त्याचा फायदा काय? तसेच निविदा प्रक्रिया कशी झाली? याच्या माहितीसाठी विभागात फाइलच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून फाइल अतिरिक्त आयुक्तांकडे असल्याचे कारण सांगत ती उपलब्ध करून दिली जात नाही.
मात्र नेमकी फाइल कोणाकडे आहे की ती गहाळ झाली असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी डीबीटी राबवली जात आहे. त्यामध्ये देखील ठेकेदार घुसवत प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यावर तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. असे असतानाही बालवाडीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय साहित्य देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जुलै २०२५ मध्ये मध्यवर्ती भांडारकडे याबाबत मागणी केली होती. तसेच बालवाडी समनव्यक यांच्याकडे देखील साहित्य देण्याबाबत अहवाल मागितला होता. समनव्यकांनी यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक साहित्य असल्याचा दावा केला होता. तसेच विद्यार्थ्यांच्या हातांच्या स्नायूंचा विकास या साहित्याने होणार आहे. कार्यानुभवचे साहित्य देखील उपयुक्त असून मराठी अंकलेखन असल्याचा दावा केला होता.
त्यानुसार, लेखन साहित्य खरेदी करण्यासाठी महाटेंडर पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी तीन ठेकेदारांनी निविदेमध्ये भाग घेतला. त्यापैकी मे. टार्गेट व्हेंचर्स प्रा. लि. या ठेकेदाराने ८८ लाख ६४ हजार ७३५ निविदा दराच्या १०.५४ टक्के कमी ७९ लाख ३८ हजार ३७० रुपये इतका दर सादर केला.
त्या खर्चास व लेखन साहित्य खरेदीस स्थायी समितीने मान्यत दिली आहे. मात्र, याची फाइल मध्यवर्ती भांडार विभागातून गायब झाली आहे. सलग पंधरा दिवस फाइल पाहण्यासाठी मागणी करूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
“बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदीची फाइल अतिरिक्त आयुक्तांकडे आहे. फाइल मिळाल्यानंतर दाखवतो.”
– बुधा दाभाडे, भांडारपाल.




