PCMC Property Tax: पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत
PCMC Property Tax: डेटा-आधारित संवाद प्रणालीमुळे कर संकलनाला वेग; महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तात्काळ मालमत्ता कर भरण्याचे आवाहन.

PCMC Property Tax – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत जे मालमत्ताधारक चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरतील, त्यांना सामान्य करावर ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी तत्काळ ऑनलाइन कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरणा, उपलब्ध सवलत योजना, कर भरण्याची अंतिम मुदत तसेच थकबाकीबाबतची माहिती एसएमएसद्वारे वेळोवेळी मालमत्ताधारकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यासोबतच टेली कॉलिंगच्या माध्यमातून मालमत्ताधारकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या कर भरण्याच्या स्थितीची माहिती देण्यात येत आहे.
उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते, व ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कर भरण्याच्या सुविधांची माहितीही देण्यात येते. मालमत्ताधारकांकडून प्राप्त होणाऱ्या शंका व अडचणींची नोंद घेऊन त्यांचे संबंधित विभागामार्फत निराकरण करण्यात येते. डेटा-आधारित संवाद प्रणालीचा अवलंब केल्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत आवश्यक माहिती नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचविणे शक्य झाले आहे.
त्याचबरोबर जनजागृती, थेट संवाद आणि माहितीचे नियमित प्रसारण यामुळे मालमत्ता कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास मदत झाली आहे. मात्र अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी कर भरला नाही, त्यांच्यासाठी आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. बिगर निवासी औद्योगीक, मिश्र थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.तसेच निवासी मालमत्तांच्या थकबाकीदारांचे नळ जोडणी खंडित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.. त्यामुळे थकबाकीदारांनी कोणतीही प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ मालमत्ता कराचा भरणा करून उपलब्ध सवलतीचा लाभ घ्यावा.”
– सचिन पवार, उपायुक्त, कर संकलन विभाग






