तो पुन्हा येतोय! आक्षेपार्ह वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादियाचा पहिला व्हिडिओ आला समोर, म्हणाला…

Ranveer Allahbadia | प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये त्याने केलेल्या एका वादग्रस्त टिप्पणीमुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. यानंतर त्याच्याविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती. त्यावेळी रणवीरने व्हिडिओ आणि पोस्टद्वारे माफी मागितली होती.
आता या वादानंतर रणवीरने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या कामाबद्दल माहिती दिली आहे.
इन्स्टाग्रामवर रणवीरची पोस्ट
रणवीरने सर्वप्रथम आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये त्याच्यासोबत इतर काही लोकही दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या प्रियजनांचे आभार, विश्वाचे आभार. एका नवीन चॅप्टरची सुरुवात, रिबर्थ” यानंतर त्याने यूट्यूबवर एक व्हिडिओही शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि माफीही मागितली.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये रणवीर काय म्हणाला?
रणवीरने ‘लेट्स टॉक’ नावाने व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो की, “नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी सर्व समर्थक आणि हितचिंतकांचे आभार मानू इच्छितो. तुमच्या सकारात्मक मेसेजमुळे मला आणि माझ्या कुटुंबाला खूप मदत झाली. कारण हा काळ खूप कठीण होता. उघडपणे ऑनलाईन धमक्या मिळणे, अनेक मीडिया आर्टिकल्स आणि बरंच काही अनुभवलं. त्या सगळ्यामध्ये तुमच्या मेसेजने आम्हाला खूप आधार दिला.”
व्हिडिओमध्ये रणवीरने अधिक जबाबदारीने कंटेंट तयार करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, बरेच लोक मला मुलगा मानतात, बरेच लोक मला भाऊ मानतात, खासकरून त्या सर्वांची माफी मागतो. येत्या 10, 20, 30 वर्षांमध्ये, जोपर्यंत मी कंटेंट बनवत राहीन, तोपर्यंत अधिक जबाबदारीने कंटेंट बनवेन.
रणवीर पुढे म्हणाला की, बरेच लहान मुलं देखील आमचा शो पाहतात. त्यामुळे, पुढे मी खूप जबाबदारीने काम करेन. माझी तुमच्याप्रती जबाबदारी आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे, त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. ज्या लोकांनीही मला पाठिंबा दिला, त्यांनी शक्य असल्यास पुन्हा एकदा मला त्यांच्या मनात जागा द्यावी. आणखी एक संधी द्यावी. मला कंटेंट क्रिएशनची खूप आवड आहे, मला पॉडकास्टिंगची आवड आहे.”
व्हिडिओमध्ये रणवीरने सांगितले की या वादामुळे त्याचे मानसिक आरोग्य खूप बिघडले होते आणि त्यावेळी ध्यान, साधना आणि प्रार्थनेने यातून बाहेर पडण्यास मदत केली. आता पुन्हा आठवड्यातून 4 पॉडकास्ट येतील, असेही त्याने सांगितले. यापुढे तुम्हाला ‘द रणवीर शो’ वर एक नवीन रणवीर दिसेल, पॉडकास्ट लवकरच परत येत आहे, असे तो म्हणाला.





