रणवीर अलाहाबादिया बेपत्ता झालाय? स्वतः माहिती देत म्हणाला, ’घाबरलोय… पण मी पळून जात नाहीये’

Ranveer Allahbadia | ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शो मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याने रणवीरवर टीका केली जात आहे. तसेच, पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच रणवीरचा फोन बंद असल्याचे व तो बेपत्ता झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता त्याने स्वतः स्पष्टीकरण देत मी या प्रकरणात पोलिसांशी सहकार्य करत असल्याचे सांगितले. तसेच, सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही त्याने सांगितले.
या प्रकरणावर रणवीरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. रणवीर म्हणाला की, मी आणि माझी संपूर्ण टीम पोलीस व अन्य तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. जी काही प्रक्रिया असेल, त्याचे मी पालन करेल. पालकांबाबत मी केलेलं वक्तव्य हे असंवेदनशील अपमान करणारे होते. पण, इथून पुढे चांगलं काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी असेल. या प्रकाराबद्दल मी मनापासून माफी मागतो.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोक रुग्ण असल्याचं भासवून माझ्या आईच्या दवाखान्यात घुसले होते. त्यांनी क्लिनिकवर हल्ला केला. मी प्रचंड घाबरलोय आणि मला नाही माहिती की काय केलं पाहिजे. मी पळून जात नाहीये. मला पोलिसांवर आणि भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याविरोधात रणवीरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.





