Ranji Trophy 2024 : एकाच डावात 10 विकेट्स; IPL मध्ये मुंबईकडून खेळलेल्या गोलंदाजानं रणजी स्पर्धेत रचला इतिहास, पहा Video

Anshul Kamboj 10 Wickets Ranji Trophy : अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफीच्या एकाच डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. अंशुल हरियाणाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि केरळविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. अंशुल कंबोज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे, परंतु त्याला आयपीएल 2025 साठी एमआय फ्रँचायझीने कायम ठेवलेले नाही.
अंशुलच्या आधी बंगालच्या प्रेमांगशु चटर्जी आणि राजस्थानच्या प्रदीप सुंदरम यांनी ही कामगिरी केली आहे. अंशुलने केरळविरुद्धच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात 30.1 षटके टाकली, ज्यात त्यानं 49 धावां देताना सर्व 10 बळी घेत शानदार कामगिरी केली. हरियाणा विरुद्ध केरळ सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस अंशुलने 8 विकेट घेतल्या होत्या, तर तिसऱ्या दिवशी सकाळी त्याने बासिल थम्पी आणि नंतर शॉन रॉजरची विकेट घेत केरळचा डाव 291 धावांवर संपुष्टात आणला.
1⃣ innings 🤝 1⃣0⃣ wickets 👏
Historic Spell 🙌
3⃣0⃣.1⃣ overs
9⃣ maidens
4⃣9⃣ runs
1⃣0⃣ wickets 🔥Watch 📽️ Haryana Pacer Anshul Kamboj’s record-breaking spell in the 1st innings against Kerala 👌👌#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RcNP3NQJ2y
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 15, 2024
धोनीच्या जोडीदाराचा मोडला विक्रम…
याआधी हरियाणासाठी गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी जोगिंदर शर्माच्या नावावर होती. 2004-2005 च्या मोसमात जोगिंदरने विदर्भाविरुद्ध एका डावात 8 विकेट घेतल्या होत्या. अंशुल यावर्षी आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता. त्याने 3 सामने खेळले आणि 2 बळीही घेतले. पहिल्या सत्रातील त्याच्या कामगिरीचे खूप कौतुक झाले. अंशुल कर्नाल, हरियाणाचा आहे आणि त्याने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 18 सामने खेळले आहेत आणि 47 बळी मिळवले आहेत.
हरियाणाला बनवलं चॅम्पियन….
अंशुल कंबोज अलीकडेच इमर्जिंग टीम्स आशिया कपमध्ये भारत अ संघाकडून खेळताना दिसला. दुलीप ट्रॉफी 2024 मध्येही त्याने आपल्या अप्रतिम कामगिरीने खळबळ उडवून दिली होती. दुलीप ट्रॉफी दरम्यान त्याने एकाच डावात 8 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. हरियाणा विजय हजारे ट्रॉफीमध्ये गतविजेता आहे आणि अंशुल कंबोजने या स्पर्धेत 10 सामन्यांत 17 बळी घेत आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.





