Ranji Trophy 2024-25 : महाराष्ट्राचा मेघालयवर दणदणीत विजय, हर्षल काटे ठरला सामन्याचा मानकरी….

छ. संभाजीनगर – मुर्तझा ट्रॅकवलाने केलेल्या दमदार अर्धशतकाच्य जोरावर महाराष्ट्र संघाने मेघालय संघाला १० गडी राखून पराभूत करताना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना मेघालय संघाने बालचंदर अनिरुद्धच्या १४२ धावांच्या जोरावर पहिल्या डावात ८८.३ षटकांत २७६ धावांपर्यंत मजल मारली होती.
Maharashtra Won by 10 Wicket(s) #MAHvMEG #RanjiTrophy #Elite Scorecard:https://t.co/eiCW9fDANx
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 29, 2024
महाराष्ट्राने पहिल्या डावात हर्षल काटेची दमदार १२८, अझीम काझी ६६ व मंदार भंडारीच्या ७३ धावांच्या जोरावर १०६.२ षटकांत ३६१ धावा करताना चोख प्रत्युत्तर दिले होते. पहिल्याच डावात महाराष्ट्राला ८५ धावांची आघाडी मिळाली होती. मेघालय संघाचा दुसरा डाव मुकेश चौधरीच्या ४, प्रदीप दाढे व रजनीश गुरबानी यांच्या प्रत्येकी २ बळींमुळे ५५.५ षटकांत १८५ धावांवर संपुष्टात आला. महाराष्ट्र संघाने बिनबाद १०४ धावा करताना विजय साकारला.
लढतीच्या चौथ्या दिवशी मेघालयचे सुमित कुमार (२४) व आर्यन बोरा (०) यांनी ८ बाद १५७ पासून पुढे खेळायला सुरुवात केली. मुकेश चौधरी व प्रदीप दाढे यांनी झटपट मेघालय संघाचे शेपूट गुंडाळले. त्यामुळे मेघालय संघाचा डाव १८५ धावांमध्ये गुंडाळला गेला. विजयासाठी आवश्यक असणाऱ्या धावांचे आव्हान घेऊन महाराष्ट्राचे सलामीवीर सिद्धेश वीर व मुर्तझा ट्रकवाला उतरले. दोघांनी केवळ २१.१ षटकांत बिनबाद १०४ धावा करताना संघाला मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राच्या तीन लढती झाल्या असून १ अनिर्णित, १ विजय व १ पराभव झाला आहे. महाराष्ट्र व जम्मू काश्मीर लढत अनिर्णित राहिली होती तर मुंबईकडून महाराष्ट्राला पराभव स्वीकारावा लागला होता. तीन लढतीत मिळवून महाराष्ट्राचे एकूण ८ गुण झाले आहेत. तीन विजयासह बडोदा संघ अ गटातून अव्वल स्थानी आहे.





