Ranji Trophy 2024/25 : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, शतकवीर आयुष्य ठरला सामन्याचा मानकरी….

Ranji Trophy 2024/25 (Maharashtra vs Mumbai) : पहिल्या सामन्यात बडोद्याकडून झालेल्या दारुण पराभवातून सावरलेल्या गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक गटातील दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राचा नऊ गडी राखून पराभव करून आपली मोहीम पुन्हा रुळावर आणली. दरम्यान, पहिल्या सामन्यात 42 वेळचा चॅम्पियन मुंबई संघ बडोद्याविरूध्द 84 धावांनी पराभूत झाला होता. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा 17 वर्षीय आयुष्य म्हात्रे सामन्याचा मानकरी ठरला.
पहिल्या डावात मुंबईने महाराष्ट्राला अवघ्या 126 धावांत गुंडाळले होते. यादरम्यान फलंदाजीत अझीम काझीने 36 तर निखिल नाईकने 38 धावांची खेळी केली तर मुंबईकडून मोहित अवस्थी आणि शाम्स मुलानी यांनी प्रत्येकी 3 तर शार्दूल ठाकूर आणि रॉयस्टन डाएस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
त्यानंतर प्रत्युत्तरात मुंबईने पहिल्या डावात 17 वर्षीय म्हात्रेच्या 176 धावा आणि श्रेयस अय्यरच्या 142 धावांच्या खेळीच्या जोरावर 441 धावसंख्येपर्यंत मजल मारताना मोठी आघाडी घेतली. यादरम्यान महाराष्ट्राकडून गोलंदाजीत हितेश वाळुंजनं सर्वाधिक 6 तर प्रदीप दाढेने 2 विकेट मिळवल्या.
प्रत्युत्तरात महाराष्ट्राने दुसऱ्या डावात 388 धावा केल्या आणि मुंबईला केवळ 75 धावांचे माफक लक्ष्य मिळाले पण ते विजयासाठी अपुरे होते. यादरम्यान फलंदाजीत कर्णधार ऋतुराज गायकवाड (145) व अंकित बावणे (101) यांनी शतकी खेळी तर एस धसने 98 धावांची खेळी केली पण उर्वरीत 7 फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. मुंबईकडून दुसऱ्या डावात मोहित अवस्थी, शाम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
We Fought Hard, We’ll Come Back Stronger! 💪
Despite Mumbai’s victory, our team showed resilience with standout centuries by Ruturaj Gaikwad and Ankeet Bawane, along with Hitesh Walunj’s fiery 6-wicket haul. Maharashtra will rise again! 🏏#MaharashtraCricket #RanjiTrophy2024… pic.twitter.com/zqxApEmKFT
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) October 21, 2024
विजयासाठी 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने रविवारी बिनबाद 13 धावा केल्या होत्या. त्यानंतर सोमवारी पृथ्वी शॉने 36 चेंडूत 39 धावा आणि हार्दिक तामोरने 26 चेंडूत नाबाद 21 धावा करत संघाला 13.3 षटकांत विजय मिळवून दिला. आयुष म्हात्रे 15 धावांवर बाद झाल्याने मुबंई संघाला बोनस गुण मिळवता आला नाही. एखाद्या संघाने सामना डावाने किंवा 10 विकेट्सने जिंकल्यास त्याला 7 गुण दिले जाणार आहेत. केवळ सामना जिंकल्यास 6 गुण मिळतात. यानुसार मुबंईला केवळ 6 गुण मिळाले.




