Ranji Trophy 2024-25 : अय्यरचे द्विशतक अन् मुलाणीचे 11 बळी; मुंबईने ओडिशावर नोंदवला मोठा विजय…

Ranji Trophy 2024-25 (Mumbai vs Odisha) – फिरकीपटू शम्स मुलाणी (71 धावांत पाच बळी) आणि हिमांशू सिंग (77 धावांत चार बळी) यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर गतविजेत्या मुंबईने शनिवारी मुंबई येथे झालेल्या रणजी करंडक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात ओडिशाचा एक डाव आणि 103 धावांनी पराभव केला. मुलानीनं या सामन्यात सर्वाधिक 11 विकेट घेतल्या आणि त्याला या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
Mumbai Won by an innings and 103 Run(s) #MUMvODI #RanjiTrophy #Elite Scorecard:https://t.co/S9FMw76jDz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 9, 2024
मुंबईने ( #MUMvODI )आपला पहिला डाव चार गड्यांच्या मोबदल्यात 602 धावा करून घोषित केला. श्रेयस अय्यरचे द्विशतक (233) आणि सिद्धेश लाडच्या नाबाद 169 धावांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात ओडिशाचा संघ पहिल्या डावात 285 धावाच करू शकला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फॉलोऑन दिल्यानंतरही ओडिशाचा संघ दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करू शकला नाही आणि 214 धावांतच गारद झाला.
ओडिशाने आज सकाळी दुसरा डाव पाच बाद 126 धावावरून पुढे सुरू केला, पण मुलानीने यष्टिरक्षक फलंदाज आशीर्वाद स्वेन (51) याला बाद करून त्याच्या उरल्या-सुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. त्यानंतर ओडिशाचे उर्वरित फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत आणि त्यांचा डाव लवकरच संपुष्टात आला. यासह मुंबईने डावाच्या फरकाने विजय मिळवत बोनस गुण देखील मिळवला.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
श्रेयस अय्यरची चमकदार कामगिरी….
29 वर्षांचा अनुभवी भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पण त्याने या रणजी सामन्यात धमाकेदार खेळी करत कसोटी संघात पुनरागमन करण्याचा दावा केला आहे. अय्यरने 228 चेंडूंचा सामना केला आणि 102 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 233 धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून 24 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकारही पाहायला मिळाले. मात्र, अय्यरला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघात स्थान मिळालेले नाही. दरम्यान मध्यंतरीच्या खराब कामगिरीमुळे अय्यरला या वर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयचा केंद्रीय करारही मिळाला नव्हता.





