मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी खेळली मोठी खेळी; चंपाई सोरेन यांच्या जागी त्यांच्याच सोबत्याला करणार मंत्री, मुहूर्तही ठरवला..

Jharkhand Politics – झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी संध्याकाळी मंत्रीपदाचा आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रीपद रिक्त झाले आहे. चंपाई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) घाटशिला येथील आमदार रामदास सोरेन यांना त्यांच्या जागी मंत्री करण्यात येणार आहे. रामदास सोरेन यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्र पाठवण्यात आले आहे.
ते मंत्रीपदाची शपथ कधी घेणार?
शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. याच दिवशी चंपाई सोरेनही औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सीएम हाऊसमधून फोन आल्याची पुष्टी खुद्द रामदास सोरेन यांनी केली आहे. चंपाई सोरेन यांच्याकडे उच्च आणि तांत्रिक शिक्षण आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी होती. ही दोन्ही खाती रामदास सोरेन यांना दिली जातील, अशी अपेक्षा आहे.
कोण आहेत रामदास सोरेन?
चंपाई सोरेन यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यातील कोल्हाण विभागातील राजकीय समीकरणावर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत त्यांच्या जागी रामदास सोरेन यांना मंत्री करण्याचा निर्णय म्हणजे राजकीय ‘डॅमेज कंट्रोल’ कवायत म्हणून पाहिले जात आहे, कारण चंपाई सोरेन यांच्याप्रमाणेच 61 वर्षीय रामदास सोरेन हे देखील संथाल आदिवासी समाजाचे आहेत आणि त्यांचे राजकारण क्षेत्रही कोल्हाण केंद्रित आहे.
रामदास सोरेन हे दोन वेळा घाटशिला येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 मध्ये पहिल्यांदा आणि 2019 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. ते पूर्व सिंगभूमचे जिल्हाध्यक्षही आहेत. रामदास सोरेन हे झारखंड चळवळीतही सक्रिय होते. त्यांनी शिबू सोरेन आणि चंपाई सोरेन यांच्यासोबत आंदोलन केले. रामदास सोरेन यांना पहिल्यांदाच सरकारमध्ये स्थान मिळणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हेमंत सोरेन यांनी त्यांना जिल्हा परिषदेत महत्त्वाचे पद दिले होते.
चंपाई सोरेन होते नाराज –
31 जानेवारीला हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी हेमंत सोरेन जामीन मिळाल्यावर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा सहाव्या दिवशी म्हणजे 4 जुलै रोजी चंपाई सोरेन यांचा राजीनामा घेण्यात आला आणि हेमंत सोरेन यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंपाई सोरेन हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील झाले होते, पण ते नाराज होते. त्यांनी 18 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली व्यथा मांडली होती. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अपमानास्पद पद्धतीने घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.





